जत- प्रतिनिधी
जत तालुक्यातील शेगाव रोडवर जतपासुन चार कि. मी. अंतरावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकल वरील दोघेजण ठार झाले. ही घटना गुरुवारी रात्री घडली. घटनेनंतर वाहन चालक गाडीसह पसार झाला आहे. प्रकाश वाक्षे रा. जत व मारुती शिंदे रा. देवनाळ अशी मयत दोघांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, प्रकाश महादेव वाक्षे हे आपल्या मोटरसायकल (क्र. एम एच १० सी के ७०६७ हे त्यांच्या वडिलांचा मित्र मारूती सखाराम सरगर (वय ६५, रा. देवनाळ) यांना शेताकडून जतकडे घेऊन येत असता पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की , यातील दुचाकी चालक प्रकाश वाक्षे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मारूती सखाराम शिंदे हे गंभीर जखमी झाल्याने अंबुलन्सने जत ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारांसाठी सांगलीला नेत असता वाटेतच निधन झाले.
बेदरकारपणे वाहन चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात मयत प्रकाश याचे वडील महादेव लक्काप्पा वाक्षे यांनी फिर्याद दिली आहे. घटनेनंतर वाहन चालक गाडीसह पसार झाल्याने वाहन व चालकाचे नाव समजू शकले नाही. आधिक तपास सहाय्यक निरीक्षक जगताप करीत आहेत.