20 हजाराचा ऐवज लंपास
जत : प्रतिनिधी
जत शहरातील विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवाराचे छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील दुसऱ्या मजल्यावरील एक पतसंस्था, दोन दैनिकाची कार्यालये, ग्राहक सेवा केंद्र व इंजिनियर अनिल वाली यांचे कार्यालय अज्ञात चोरट्यांनी फोडून साहित्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली. तसेच गाळा नंबर 82 मधील धैर्यशील पतसंस्थेतील रोख सातशे रुपये रक्कम व गाळा क्रमांक ९४ मधील दोन लॅपटॉप असे एकूण २० हजाराचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. याबाबतची फिर्याद भाऊसाहेब जाधव यांनी जत पोलिसात दिली आहे.
शहरातील विजापुर-गुहागर राष्ट्रीय महामार्गालगत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवाराचे छत्रपती शिवाजी महाराज व्यापार व्यापारी संकुल आहे. या व्यापारी संकुलाचे 105 गाळे असून हे व्यापारी संकुल दुमजली आहे. दरम्यान बुधवारी सायंकाळी यातील दुसर्या मजल्यावरील सर्व कार्यालये नऊ वाजण्याच्या दरम्यान बंद झाली होती. शुक्रवारी सकाळी कै. धैर्यशील यशवंतराव चव्हाण ग्रामीण बिगर पतसंस्था या पतसंस्थेचे शटर उचकटलेले दिसले. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांना समजताच त्या ठिकाणी उपस्थितीत झाले. यावेळी पतसंस्थेच्या बाजूला असणार्या चार गाळ्यातील विविध कार्यालयांचे साहित्य विस्कटलेले मोडतोड झालेली दिसून आले. या सर्व कार्यालयातील साहित्याची अज्ञात चोरट्याने मोडतोड करून मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याचे निदर्शनास आले. तसेच धैर्यशील चव्हाण पतसंस्थेमधील रोख रक्कम सातशे रुपये चोरट्यांनी चोरून नेली आहे. तसेच गाळा नंबर ९४ मधील दोन लॅपटॉप चोरट्याने चोरून नेले आहेत. गाळा नंबर १०० मधील कार्यालयातील संगणक व इतर साहित्याची नासधूस झाली आहे.
दरम्यान, या चोरीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेश रमाघरे, उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांनी तातडीने भेट दिली. जत तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून या महिन्यातील तालुक्यातील ही चौथी चोरी आहे.