नगरसेवकांचे दुर्लक्ष; अंधारात मेणबत्ती आंदोलन; मनपाचा निषेध
कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडच्या प्रभाग आठमधील खारे मळा परिसर पथदिव्याअभावी बऱ्याच दिवसांपासून अंधारात असून याकडे स्थानिक राष्ट्रवादी व भाजपाचे सर्व नगरसेवक आणि मनपा प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. मनपाच्या दुर्लक्षित कारभाराच्या निषेधार्थ अष्टविनायक फाऊंडेशनच्यावतीने बुधवारी रात्री रस्त्यावर अंधारात मेणबत्या पेटवून तसेच मोबाईलच्या टॉर्चचा उजेड पाडून निषेध आंदोलन करण्यात आले.
खारेमळा परिसरात पथदिव्यांची सोय करण्याबाबत मनपा प्रशासनाकडे विचारणा केली असता मनपा अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. नगरसेवकांना माहिती असूनही कोणतेही नगरसेवक या भागाकडे फिरकत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी नगरसेवकांच्या दुर्लक्षित कारभारावरही टिका केली. अष्टविनायक फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश निर्मळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.