सांगली- प्रतिनिधी
अनैतिक संबंधाच्या संशयावरून जयसिंग शामराव जमदाडे यांचा शीर धडावेगळे करून खून केल्याप्रकरणी आरोपी लक्ष्मण निवृत्ती मुढे (वय 47, रा. देवराष्ट्रे, ता. कडेगाव) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. बी. जाधव यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी खटला चालवला.
खटल्याची हकीकत अशी, मृत जयसिंग शामराव जमदाडे यांच्याबरोबर आरोपी लक्ष्मणची पत्नी सुनिता हिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय लक्ष्मणला होता. त्यामुळे संशयातून जमदाडे यांच्यावर लक्ष्मणचा राग होता. 4 जून 2020 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास जमदाडे हे त्याच्या मालकीच्या शेतजमिनीतून वैरणीचा भारा दुचाकीवर टाकून कुंभारगाव ते शिरगाव जाणा-या रस्त्याने त्याच्या घराकडे जात होते. देवराष्ट्रेच्या हद्दीतील रस्त्यावर आरोपी लक्ष्मण याने वाट सोडण्याच्या कारणावरून जमदाडे यांच्याशी भांडण काढले. तेव्हा त्याच्या हातातील कु-हाडीने जमदाडे यांच्या पाठीवर, मानेवर, गळ्यावर वार करून खून केला. त्यांचे शीर धडावेगळे करून शेतातील बांधाच्या दगड व झाडीमध्ये टाकून पुरावा नष्ट केला.
खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर चिंचणी-वांगी पोलिसांनी आरोपी लक्ष्मण याला अटक केली. आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक एस. डी. गोसावी यांनी तपास केला. सरकार पक्षातर्फे 8 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी अर्जुन शामराव जमदाडे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बाळासो शंकर कुरळे व संजय रामाराम मोरे यांचा जबाब ग्राह्य मानून आरोपी लक्ष्मणला दोषी ठरवले. खुनाच्या गुह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. पुरावा नष्ट केल्याबद्दलही त्याला दोषी ठरवून शिक्षा दिली. चिंचणी-वांगी पोलिस ठाण्याचे अवधूत कोळी, पोलिसांच्या पैरवी कक्षातील पोलिस कर्मचारी वंदना मिसाळ, शरद राडे, अशोक तुराई, गणेश वाघ यांचे न्यायालयीन कामकाजात सहकार्य लाभले.