Tarun Bharat

Sangli Breaking; म्हैसाळमधील ९ जणांची आत्महत्या नव्हे तर….हत्याकांड!

सोलापूरचे दोघे अटकेत; आत्महत्या प्रकरणाला कलाटणी; गुप्तधनातून हत्या झाल्याचा संशय

सांगली प्रतिनिधी

म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे कुटुंबाच्या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. वनमोरे कुटुंबाचा अन्नातून विषारी द्रव्य देऊन खून करण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासामध्ये समोर आली आहे. या प्रकरणी आब्बास महमंदअली बागवान (48 रा. मुस्लीम बाशा पेठ, मुलगाव रोड, सरवदेनगर, सोलापूर) व धीरज चंद्रकांत सुरवशे (30, रा. वसंत विहार ध्यानेश्वरी नगर, पुणा नाका, सोलापूर) या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्यापैकी आब्बास बागवान हा मांत्रिक असल्याची चर्चा आहे. सोमवारी 20 जून रोजी म्हैसाळ येथील डॉ. वनमोरे कुटुंबातील नऊजणांनी विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या दोन चिठ्ठय़ा पोलिसांना तपासादरम्यान सापडल्या होत्या. त्यानुसार 25 सावकारांवर सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 19 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली होती.

डॉ. वनमोरे कुटुंबाच्या मित्र तसेच नातेवाईकांकडे चौकशी सुरु होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एका पथकास डॉ. माणिक वनमोरे व पोपट व्हनमोरे यांची अनोळखी व्यक्तींसोबत गुप्तधनाबाबत भेटी होत होत्या. ती व्यक्ती वारंवार डॉ. वनमोरे यांच्या घरी येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे संशयित आब्बास बागवान व धीरज सुरवशे यांना सोलापूर येथून अटक करण्यात आली असल्याचे सांगत गेडाम म्हणाले, दोघांना मंगळवारी न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे. त्यांच्याकडे याबाबत कसून चौकशी सुरु आहे. प्रकरण आत्महत्येचे नाही. दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेच्या रात्री दोघे म्हैसाळमध्ये
अन्नातून कोणतेतरी विषारी द्रव्य किंवा वस्तू देऊन व्हनमोरे कुटुंबाचा खून करण्यात आला असल्याचा संशय आहे. त्या अनुषंगाने संशयितांच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. दोघेही संशयित रविवारी 19 जूनच्या रात्री म्हैसाळ येथे येऊन गेल्याचे चौकशी मध्ये निष्पन्न झाले आहे. दरम्यान, दोघांपैकी आब्बास बागवान हा मांत्रिक असल्याची चर्चा आहे. तर धीरज सुरवसे हा त्याच्या गाडीचा चालक असल्याची माहिती समोर येत आहे

Related Stories

उपनगराध्यक्ष मनोज शेंडेंच्या पत्नीने चोरली वीज

Patil_p

पुन्हा दरड कोसळण्याची संभावना

Rohit Salunke

फेसबुककडून 22 लाख आक्षेपार्ह जाहिरातींना डच्चू

datta jadhav

मंत्रीपद विस्ताराबाबत एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले…

Archana Banage

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ; मुंबईत खंडणीचा गुन्हा दाखल

Tousif Mujawar

सांगली : बेडग येथे दीड कोटींचे गुटखा साहित्य जप्त

Archana Banage