तानंग फाटा येथील टोयाटो शोरूममध्ये घटना, जेवणाची पार्टी सुरू असताना पाय घसरून पडला
प्रतिनिधी / मिरज
मिरज-पंढरपूर रस्त्यावरील तानंग फाटा येथे बंद पडलेल्या डीएसके टोयाटो शोरूमच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने गुंडेवाडी येथील तरुण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. अक्षय कुमार माने (वय २१, रा. मराठी शाळेजवळ कैकाडे गल्ली, गुंडेवाडी) असे मयत तरुणाचे नाव आहे. मित्रांसोबत जेवणाची पार्टी करत असताना पाय घसरून पडल्याचा अंदाज आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद झाली आहे.
मिरज – पंढरपूर रस्त्यावरील टोयोटा कंपनीचे शोरूम गेल्या अनेक महिन्यापासून बंद पडले आहे. या इमारतीची पूर्णतः मोडतोड झाली असून येथे काही तरुणांकडून दारूच्या पार्टी केल्या जातात. कंपनीने नियुक्त केलेला एक सिक्युरिटी गार्डही येथे कार्यरत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुंडेवाडी येथे राहणारा अक्षय माने आणि त्याचे काही मित्र शुक्रवारी रात्री टोयाटो शोरूमच्या तिसऱ्या मजल्यावर जेवणाची पार्टी करीत होते. रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास जेवणाची पार्टी झाल्यानंतर अक्षय माने हा पाय घसरून तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. त्याच्या डोक्याला व हातापायाला गंभीर मार लागल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. त्याचा मित्र सनी माने याने अक्षयाला मिरज शासकीय रुग्णालयात आणले होते. मात्र तत्पूर्वीच अक्षय हा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा : सांगलीत गोवा स्टाईल कॅसिनो आणि लॉटरी सेंटरच्या संघर्षातून गँगवॉर
मिरज सिविल प्रशासनाने याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रुग्णालयात येऊन त्याच्या अन्य मित्रांकडून जबाब घेतला. जेवणाची पार्टी करत असताना घसरून पडल्याने अक्षय माने याचा मृत्यू झाल्याचे मिरज ग्रामीण पोलिसात नोंद झाले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.