महिला राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगलीत निदर्शने
सांगली/प्रतिनिधी
Bilkis Bano gang rape case : बिलकिस बानोच्या (bilkis bano) ११ बलात्काऱ्यांची गुजरात सरकाने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी सुटका केली असून त्यांना पुन्हा गजाआड करण्यात यावे या मागणीसाठी सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सांगलीतील स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करत धरणे आंदोलन केले.
२००२ मध्ये गुजरातमध्ये (Gujarat) जो नरसंहार झाला त्यापैकी बिलकीस बानो एक शिकार असुन तिच्यावर ११ जणांनी सामूहिक बलात्कार केला. तिच्या तिन वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा खून करुन अवघे कुटुंब संपविले. परंतू हिम्मत न हारता बिलकिस बानोने प्रदीर्घ न्यायालयीन लढा दिला. मुंबईमध्ये विशेष CBI न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने ११ जणांना जन्मपेठेची शिक्षा सुनावली. बिलकिसला न्याय मिळाला असे वाटले होते. परंतु देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात महिलांच्या सन्मानाच्या घोषणा सायंकाळ पर्यंत हवेतच विरळून गेल्या आणि गुजरात सरकारने बिलकिस बानोच्या ११ बलात्काऱ्यांची नियमबाह्य सुटका केली. हे कृत्य केवळ असंविधानिकच नाही तर मानवतेला काळिमा फासणारे असून न्याय व्यवस्थेच्या चिंधडया उडवणारे आहे.
बलात्काऱ्यांची सुटका करण्याची नियमांमध्ये कुठलीही तरतूद नसताना गुजरात सरकाने हा निर्णय घेतला. या संदर्भात केंद्र सरकाने लक्ष घालावे या मागणीसाठी सांगली जिल्हा व शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करुन धरणे आंदोलन केले.