सांगली प्रतिनिधी
गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच कोयना धरण ८० टीएमसी पेक्षा जास्त भरले आहे. आज पासून पायथा विजगृहातुन २१०० क्युसेक कोयना धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे कृष्णा नदी पुन्हा पात्राबाहेर पडली आहे.
नदीला आलेल्या पूरामुळे पलुस तालुक्यातील नागठाणे बंधारा बुधवारी पाण्याखाली गेला आहे, तर औदुंबर येथील श्री दत्त मंदीर परिसरातही गुरूवार दुपारी पाणी शिरले आहे. बंधारा ठिकाणी जाण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने नागरिकांना बंदी केली आहे. तर औदुंबर येथिल श्री दत्त मंदीर अजुन ही भक्तांसाठी खुले आहे. पाणी मंदीर परिसरातील फरशीवर असल्यामुळे अनेक तरूण, तरूणी, कुटूंबीयांसोबत पाण्यात सेल्फी काढण्यात व्यस्त होते. साधारण अजुन ३ फुट पाणी पातळी वाढली तर मंदीर दर्शनासाठी बंद करण्यात येते.