नागरिकांनी मूर्तीदानावर भर द्येण्याचे आयुक्तांचे आवाहन
सांगली: मिरजेत अनंत चतुर्दशी दिवशी होणाऱ्या सार्वजनिक आणि घरगुती गणपती विसर्जनच्या पार्श्वभूमीवर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने आपली तयारी पूर्ण केली आहे. मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त संजीव ओव्होळ, उपायुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त चंद्रकांत आडके यांनी सर्व सुविधा सज्ज ठेवल्या आहेत.
यामध्ये मिरज येथे 5 ठिकाणी विसर्जन कुंड, 1 फिरते विसर्जन कुंड, कृष्णा घाट, गणेश तलाव येथे 6 निर्माल्य कलश, 50 कर्मचारी, 8 तराफा, निर्माल्य व दानमूर्ती वाहतूकीसाठी 16 वाहने, 2 बोट, स्व.नि, मुकादम, अग्निशमन जवान इ. यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. विसर्जन संपल्यानंतर रस्ते सफाई साठी 25 कर्मचारी नेमण्यात आले असून ते विसर्जननंतर मिरजेतील विसर्जन मार्गावरील रस्त्याची स्वच्छता करणार आहेत. यासाठी आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे यांच्यासह वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, अनिल पाटील आणि सर्व स्वच्छता निरीक्षक कार्यरत आहेत. याचबरोबर विसर्जन मार्गावर आणि विसर्जन ठिकाणी पुरेशी विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच निर्माल्य वेळेत उचलण्याची सोयही करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी मनपाच्या रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या फायर फायटर तसेच बोटी सुद्धा गणेश तलाव आणि कृष्णा घाटावर तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी मिरजेत ठिकठिकाणी विसर्जन कुंड ठेवण्यात आले आहेत. तसेच विसर्जन ठिकाणी मूर्तीदान कक्षही उभारण्यात आला आहे. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांनी निर्माल्य हे निर्माल्य कुंडामध्ये टाकावे तसेच मूर्तीदानावर अधिक भर द्यावा असे आवाहन मनपा आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे.