सोन्याळ / वार्ताहर
जत पूर्वभागातील सोन्याळ, माडग्याळ, उटगी जाडर बोबलादसह अनेक गावांत मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला होता. ढगाळ वातावरण आणि उकाडा कायम असताना आज दुपारी तीनच्या दरम्यान जत पूर्वभागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे.
यंदा तापमानाने उचांक गाठला आहे. तापमान ४२ ते ४४ अंशापर्यंत जाऊन पोहोचले होते. उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. आज पडलेल्या पावसामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे. मान्सून पूर्व पडलेल्या या पावसामुळे शेतीच्या मशागतीच्या कामाला आता वेग येणार असे चित्र आहे.
तसेच मिरज शहर आणि परिसरात गुरूवारी सायंकाळी पाचनंतर मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे अवघे शहर जलमय झाले. सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि हवेत गारवा होता. पाच वाजण्याच्या सुमारास सर्वत्र काळोख दाटून आला होता. अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शहरात पाणीच पाणी झाले असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कडेगाव तालुक्यातील सोनहिरा परिसरातही पाऊसाने सुरवात केली आहे. विजांचा गडगडाट व वाराही जोरात असल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
खानापूर घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाची तासभर रिमझिम. कडक उन्हाळ्यात चांगला पाऊस पडल्याने नागरिकांसह शेतकरीही सुखावला.
पलूस शहरासह तालुक्यातील बहुतांशी भागात बुधवारी सायंकाळी 5.30 पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसाने पलूस शहराबरोबरच तालुक्याला झोडपून काढले होते. द्राक्ष बागायतदारांना सुद्धा या पावसाचा जोरदार फटका बसला. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. सकाळपासून परिसरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरु झाला. साधारण अर्धा तास पावसाने झोडपून काढले.