गव्हाणच्या जवानाला शोकाकूल वातावरणात अतिंम निरोप, निधनाने गव्हाणसह परिसर गहिवरला
मणेराजूरी / वार्ताहर
गव्हाण ता. तासगाव येथील भारतीय सैन्यदलातील युनिट ५ पॅरा युनिटचे जवान अमोल एकनाथ पवार (वय ३०) यांना गुरुवारी बाराच्या दरम्यान शोकाकूल वातावरणात शासकीय इतमात अखेरचा निरोप देण्यात आला. गव्हाण ( विठ्ठलनगर ) येथे अमोल पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळीप्रशासकीय अधिका-यांसह तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अमोल पवार यांच्या पार्थिवास पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. गव्हाण गाव पूर्णत: बंद ठेवून या जवानाला श्रद्धांजली वाहण्यात आली.
लष्करातील अमोल पवार हे लखनऊ येथे युनिट ५ पॅरामध्ये कार्यरत होते. मंगळवारी अचानक त्यांच्या प्रकृती बिघडल्याने त्यांना लखनऊ येथील कमांडो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांचे निधन झाले. बुधवारी रात्री अमोल पवार यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणण्यात आले. गुरुवारी सकाळी पार्थिव गव्हाण या जन्मगावी घरी आणण्यात आले. यावेळी आई, वडील, पत्नीसह नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. अत्यंदर्शन घेणेसाठी सारा गाव लोटला होता यामध्ये महिलांची उपस्थिती मोठी होती .
सजवलेल्या ट्रॅक्टरमधून पार्थिव अंत्यसंस्कारसाठी नेण्यात आले. याठिकाणी युनिट ५ पॅराचे कमांडो सुभेदार सुरेश भोले व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सलामी दिली; यावेळी वीर जवान अमर रहेच्या घोषणांनी परिसर दुमदुमला.
यावेळी तहसीलदार रवींद्र रांजणे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील, मंडल अधिकारी राजश्री सानप, तलाठी शिवाजीराव चव्हाण, हणमंतराव देसाई, गव्हाण गावचे सरपंच हणमंत पाटील, आणि ग्रामस्थांनी त्यांना पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहली.
शांत, हसतमुख, मनमिळावू स्वभावाचे अमोल यांच्या अचानक जाण्याने कुंटूबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या महिन्यात (१२) तारखेला अमोल सुट्टीवर येणार होते, असा त्यांनी घरी निरोप दिला होता. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. त्यांना पहाण्याऐवजी त्यांचे पार्थिव बघण्याचा विचित्र योगायोग कुंटुबिय व गावकऱ्यांना आला. त्यांनी देशसेवेसाठी आपली १३ वर्षे अर्पण केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी अनुजा, मुलगी आरोही (वय ४), मुलगा अधिराज (वय२), दोन बहिणी असा परिवार आहे.