राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी रस्सीखेच; हर्षवर्धन पाटील, पंकजा मुंडेही शर्यतीत
संजय गायकवाड सांगली
राज्यातील सत्तातरानंतर आता राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली असून, सांगली जिल्हय़ातून भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शिराळय़ाचे भाजप नेते सत्यजीत देशमुख आणि माजीमंत्री सदाभाऊ खोत यांची नावे चर्चेत असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, आघाडी सरकारच्यावतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे 12 जणांची नावे पाठवण्यात आली होती. त्यावर राज्यपालांकडून निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. दरम्यानच्या काळात राज्यात ठाकरे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळातील 12 जणांची नावे मागे पडली आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी नव्याने 12 जणांची यादी पाठवली जाण्याची शक्यता आहे. अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नसला, तरी मंत्रिमंडळ विस्तारानंतर 12 जणांच्या यादीवर लगेचच निर्णय होण्याची शक्यता असल्याने, इच्छुकांनी आतापासून फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, भाजपच्या पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्हय़ातील दुसऱया-तिसऱया फळीतील नेत्यांना ताकद देण्याच्यादृष्टीने पक्षातर्फे महामंडळे आणि आमदारकी अशी काही पदे मिळण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीमध्ये आपला नंबर लागावा, यासाठी भाजपमध्ये मोठी रस्सीखेच असली, तरी सांगली जिल्हय़ातून आमदारपदासाठी इच्छुकांकडून फिल्डिंग लावण्यास सुरूवात झाली आहे.
राज्यपाल नियुक्त 12 आमदारपदासाठी जिल्हय़ातून पृथ्वीराज देशमुख, सत्यजीत देशमुख, सदाभाऊ खोत यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, नीता केळकर आदींनी मोठी फिल्डिंग लावली आहे. पृथ्वीराज आणि सत्यजीत देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईमध्ये भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यामुळे जिल्हय़ातून कोणाचा नंबर लागणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
चौकट भाजप नेत्यांना बळ मिळणार का?
दरम्यान, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या शर्यतीमध्ये भाजपमधील राज्यभरातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पंकजा मुंडे यांच्यासारखे दिग्गज्ज नेतेमंडळी शर्यतीत असल्याने, जिल्हय़ातून कोणाचा नंबर लागणार की, पुन्हा हुलकावणी मिळणार. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. पण, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच 2023 मध्ये होऊ घातलेली सांगली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक याबरोबरच सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि लगेचच होणाऱया नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपाची थेट लढत राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर होणार असल्याने, दोन्ही काँग्रेसशी दोन हात करण्यासाठी पक्षाने जिल्हय़ाला यावेळी संधी द्यावी, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यातून मागणी होत आहे.