दुपारी बारापर्यंत होणार चित्र स्पष्ट; सरपंचासह 4719 उमेदवारांचा आज फैसला; विजयी मिरवणुकांवर बंदी
सांगली प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून मंगळवारी दुपारी बारापर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. सोमवारी जिल्हाधिकाऱयांनी मतमोजणीच्या तयारीचा ऑनलाईन आढावा घेतला. जिह्यातील 416 ग्रामपंचायतीसाठी रविवारी अत्यंत चुरशीने 80.18 टक्के मतदान झाले आहे. सरपंचासह 4719 सदस्यांच्या राजकीय भवितव्याचा आज फैसला होणार आहे.
सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरवात होणार असून टपाल मतदान मोजणी सर्वप्रथम होणार आहे. दुपारी बारापर्यंत सर्व ग्रामपंचायतींच्या निकालांचे चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली. उमेदवारांसह समर्थकांनी ग्रामपंचायत निकालावर पैजा लावल्या आहेत.
तालुकानिहाय मतमोजणीची ठिकाणे पुढीलप्रमाणे ः मिरज – शासकीय धान्य गोडावून वैरण बाजार मिरज, कवठेमहांकाळ – तहसील कार्यालय कवठेमहांकाळ, नवीन प्रशासकीय इमारत कवठेमहांकाळ, तासगाव – बहुउद्देशीय हॉल तहसील कार्यालय तासगाव, खानापूर-विटा – शासकीय धान्य गोदाम हणमंत नगर, उपविभागीय अधिकारी विटा यांच्या कार्यालयासमोर, आटपाडी – मध्यवर्ती प्रशासकीय भवन आटपाडी, तहसील कार्यालय आटपाडी पहिला मजला मिटींग हॉल, जत – तहसिल कार्यालय जत, पलूस – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत पलूस, कडेगाव – महात्मा गांधी विद्यालय कडेगाव, वाळवा – शासकीय धान्य गोदाम इस्लामपूर आणि शिराळा – तहसील कार्यालय शिराळा नवीन प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात मतमोजणी होणार आहे.
मिरज तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींची 22 टेबलावर 8 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी एका टेबलवर होणार आहे. तासगाव तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींची 15 टेबलावर 7 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी तीन टेबलवर होणार आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींची 15 टेबलावर 7 फेरीत मतमोजणी होणार आहे. जत तालुक्यातील 77 ग्रामपंचायतींची 20 टेबलावर 15 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी एका टेबलवर होणार आहे. खानापूर-विटा तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींची 16 टेबलावर 8 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी चार टेबलवर होणार आहे. आटपाडी तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींची 15 टेबलावर 6 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी एका टेबलवर होणार आहे. कडेगाव तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींची 19 टेबलावर 9 फेरीत मतमोजणी होणार आहे. पलूस तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींची 14 टेबलावर 7 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी एका टेबलवर होणार आहे. वाळवा तालुक्यातील 81 ग्रामपंचायतींची 30 टेबलावर 15 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी चार टेबलवर होणार आहे. शिराळा तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींची 15 टेबलावर 15 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी तीन टेबलवर होणार आहे.
मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रथम जितके टेबल आहेत. त्या टेबलवरती पूर्ण एक गाव अशा पध्दतीने जेवढी गावे एकावेळी टेबलवर घेता येतात. त्याप्रमाणे त्या गावांचे प्रतिनिधी, उमेदवार यांना मतमोजणी कक्षामध्ये पासधारकांना प्रवेश दिला जाणार आहे व त्या गावची मतमोजणी संपल्यानंतर सदर उमेदवार बाहेर गेल्यानंतर इतर गावांची मतमोजणी केली जाणार आहे. पोलिसांनी निकालानंतर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मिरवणुकांवर बंदी घातली आहे.