पशुवैद्यकाचे घर फोडलेः रोख 70 हजारही चोरून नेले : दांडेली येथे पर्यटनाला गेल्यानंतर चोरी : सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद
प्रतिनिधी/सांगली
मिरज तालुक्यातील समडोळी येथील पशुवैद्यक प्रणय अशोक कोल्हापूरे यांचे बंद घर फोडून यातून 25 तोळे सोन्याचे दागिने, दीड किलो चांदी आणि रोख 70 हजार रूपये असा एकूण 15 लाखांचा ऐवज चोरटय़ांनी चोरून नेला आहे. याबाबत डॉ. प्रणय कोल्हापूरे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. डॉ. कोल्हापूरे हे दांडेली येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी ही घटना घडली. डॉ. कोल्हापूरे हे घरी आल्यावर त्यांना या चोरीची माहिती झाली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी डॉ. प्रणय कोल्हापूरे हे मुळचे दानोली, जि. कोल्हापूर येथील आहेत. समडोळी हे त्यांच्या मामाचे गाव आहे. याठिकाणी ते एका दुमजली घरात भाडय़ाने राहतात. ज्यांच्या घरी कोल्हापूरे भाडय़ाने राहतात. ते मालकही याच दरम्यान बाहेर गावी गेले होते. याची माहिती घेवूनच चोरटय़ांने हे घर फोडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. डॉ. कोल्हापूरे हे समडोळी येथील नागरी वस्तीमध्ये राहतात. त्याच परिसरात एक मंदिरही आहे. त्यामुळे याठिकाणी ग्रामस्थांचे येणे-जाणे ही मोठयाप्रमाणात आहे. त्यामुळे ही घरफोडी माहितीगार असणाऱया व्यक्तीने केली असल्याचाही संशय आहे.
चोरटय़ांनी या घराचा बंद दरवाजाचे कडी-कोयंडा कटावणीने तोडून घराच्या आतमध्ये प्रवेश केला आणि घरातील कपाटात असणारे सोन्याचे 25 तोळे दागिने आणि दीड किलो चांदी तसेच 70 हजार रूपये रोख चोरून नेले आहेत.
कोल्हापूरे हे मंगळवारी सकाळी आल्यानंतर त्यांना या चोरीची माहिती समजताच त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधला तात्काळ पोलिसांनी याठिकाणी येवून पाहणी केली तसेच ठसे तज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण केले. ठसे तज्ञांनी याठिकाणचे सर्व ठसे घेतले आहेत. तर श्वान पथक या गावातीलच एका घराजवळ घुटमळले त्यामुळे पोलीस या परिसरातील गावकऱयांची माहिती घेत आहेत. तसेच हे ठसे सराईत चोरटय़ाचे आहेत का याचीही तपासणी करण्यात येत आहे.
सांगली शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रदीप शिंदे, उपनिरीक्षक सागर पाटील यांच्यासह पोलीस पथकाने पुन्हा एकदा याठिकाणची पाहणी केली. उपअधीक्षक टिके यांनी पोलिसांना या घरफोडीबाबत तपासणीचे आदेश दिले.
गावातीलच एकावर संशय
पोलीस पथकाने या घरफोडीचा तपास सुरू केला असता त्यांना गावातीलच एका व्यक्तीवर संशय आहे. त्यामुळे त्यांनी त्याचा शोधही सुरू केला आहे. दरम्यान ही व्यक्ती कोण याबाबत मात्र त्यांनी काहीही माहिती दिली नाही.