काही तासात पोलिसांकडून गुह्याचा छडा; विटा पोलिसांची कामगिरी
विटा / प्रतिनिधी
दारू पिऊन शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून सख्ख्या भावानेच भावाच्या डोक्यात लोखंडी मशीन घालून खून केल्याची घटना खानापूर तालुक्यातील बलवडी(भा.) येथे उघडकीस आली आहे. वैभव अर्जून पवार(38, रा. बलवडी(भा.) असे मयत युवकाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी 30 जून रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मयताची आई अलका अर्जून पवार यांनी फिर्याद दिली आहे. संशयीत आरोपी भाऊ विनोद अर्जून पवार(24) याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, खानापूर तालुक्यातील बलवडी(भा.) येथील वेताळबा वस्ती येथे अलका अर्जून पवार या वैभव आणि विनोद अशा आपल्या दोन मुलांसह राहण्यास आहेत. गुरूवारी 30 जून रोजी रात्री वैभव आणि विनोद या दोन सख्ख्या भावात दारू पिऊन शिवीगाळ केल्याच्या कारणावरून वादावादी झाली. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. यामध्ये संशयीत विनोद पवार याने नारळ सोलण्याचे यंत्र भाऊ वैभव याच्या डोक्यात मारले. गंभीर जखमी वैभवला विनोद यानेच सांगली येथील दवाखान्यात दाखल केले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वैभव याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी गतीने तपासाची सुत्रे हालवली. बलवडी(भा.) येथे विटा पोलिसांच्या पथकाने धाव घेतली. अधिक तपास केला असता संशयीत विनोद यानेच वैभव याच्या डोक्यात नारळ सोलण्याचे यंत्र घालून खून केल्याचे पुढे आले. या प्रकरणी मयत वैभवची आई अलका पवार यांनी फिर्याद दिली असून संशयीत विनोद पवारला अटक केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली. पोलिस निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत चव्हाण, दत्तात्रय कोळेकर, पांडुरंग कन्हेरे, पोलिस हावलदार मोहन चव्हाण, पुंडलिक कुंभार, अक्षय जगदाळे, मारूती गायकवाड, अरविंद संकपाळ यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला. दरम्यान मयत वैभव आणि संशयीत आरोपी विनोद दोघे सख्खे भाऊ असून एकत्र राहण्यास आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या एका भावाचा मृत्यू झाला आहे. मयत वैभव यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा यासह परिवार आहे. शुक्रवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात मयत वैभव याच्यावर बलवडी(भा.) येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
दिशाभूल करण्याचा प्रयत्न पण गुन्हा उघडकीस
दरम्यान सुरूवातीला संशयीत विनोद याने गंभीर जखमी असणारा आपला भाऊ वैभव याला सांगली येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी नेले. मात्र त्यावेळी संशयीत विनोद याने वैभव हा चक्कर येऊन पडला, त्यावेळी दगडावर डोके आपटल्याने जखमी झाल्याचे सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. नातेवाईकांकडे अधिक तपास केला असता संशयीत विनोद याने नारळ सोलण्याचे मशीन डोक्यात मारल्याने वैभव गंभीर जखमी झाल्याचे सांगितले. उपचारासाठी दाखल करतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्याने या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक डोके यांनी दिली.