एकूण संख्या 68, तर पंचायतीचे 16 गण वाढले; अनेक मतदार संघाची फोडाफोडी, 14 नावे बदलली, तर पाच रद्द झाले; हरकतीसाठी जून पर्यंत मुदत
सांगली प्रतिनिधी
जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणाची प्रारुप प्रभाग रचना गुरुवारी जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली. नवीन मतदारसंघ तयार करताना शेजारच्या गटाची फोडाफोड झाली आहे, त्यामुळे अनेकांची राजकीय गणित बदलली. त्यामुळे प्रभाग रचनेत राष्ट्रवादीने विरोधकांना निवडणुकीपूर्वीच धक्का दिल्याचे स्पष्ट झाले. पाच मतदारसंघ रद्द करुन नव्याने बारा गट तयार केले आहेत. वाळवा तालुक्यात येलूर मतदारसंघ रद्द तर पेठ मतदारसंघ फोडल्याने महाडीक गटाला धक्का बसला. नव्या आराखडय़ानुसार जिल्हयात जिल्हा परिषदेचे 60 वरुन 68 सदस्य तर पंचायत समितीचे 120 वरुन 136 सदस्य होतील. कवठेमहांकाळ आणि कडेगाव तालुका वगळता उर्वरित आठ तालुक्यात प्रत्येकी एक जिल्हा परिषदेचा नवीन गट झाला. प्रभाग रचनेवर 2 ते 8 जून या कालावधीत हरकती व सूचना मांडता येतील. त्यानंतर विभागीय आयुक्त यांच्याकडून अंतिम प्रभाग रचना 22 जूनला निश्चित होईल. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना 27 जून रोजी प्रसिद्ध होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होवू देणार नसल्याची भूमिका राज्य सरकारने घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात तातडीने निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले होते. राज्य निवडणूक आयोगाने प्रारुप रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता, त्यानुसार निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेची प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली.
जिल्हा परिषदेसाठी नव्याने 60 वरुन 68 गट झाले. कवठेमहांकाळ आणि कडेगाव तालुके वगळता उर्वरित आठ तालुक्यात प्रत्येकी एक मतदारसंघ वाढले. त्याशिवाय पंचायत समितीचे गण 136 झाले. प्रभाग रचनेवर 2 ते 8 जून या दरम्यान हरकती व सूचना मांडता येणार आहेत. त्यानंतर विभागीय आयुक्त यांच्याकडून प्रभाग रचना 22 जूनपर्यंत निश्चित करण्यात येणार आहे. त्यानंतर 27 जून रोजी जिल्हाधिकारी अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार आहेत. जिह्यात प्रत्यक्षात आठ मतदारसंघ वाढले असले तरी नाव बदलल्याने नव्याने बारा गट तयार झाले आहेत. पूर्वीचे पाच मतदारसंघ रद्द करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेचे मिरज तालुक्यात नांद्रे, आटपाडीमध्ये निंबवडे, वाळव्यात बहादूरवाडी, कुरळप, शिराळामध्ये सागाव, पलूसमध्ये सावंतपूर, तासगावमध्ये कवठेएकंद, जतमध्ये वाळेखिंडी, करजगी आणि माडग्याळ, खानापूर तालुक्यात करंजे हा नव्याने मतदारसंघ झाला आहे. जिह्यात नवीन मतदारसंघ करताना शेजारील दोन मतदार संघातील फोडाफोडी करण्यात आली आहे. याशिवाय जुना मतदारसंघाच्या नाव बदलून नवीन गावं घेण्यात आली आहेत. तब्बल पन्नासहून अधिक मतदारसंघाची फोडाफोडी झाल्याचे दिसून येते. बदललेल्या आणि फुटलेल्या मतदारसंघामुळे अनेक इच्छुकांची मात्र चांगलीच गोची झाली. जिह्याची राजकीय स्थिती पाहिली, तर तालुकानिहाय पक्षीय पातळीवर राष्ट्रवादीचा दबदबा दिसून येतो. जिह्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना यांची महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात खऱया अर्थाने लढत राहणार आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता भाजपची ताकद कमी असल्याचे दिसते.
आटपाडी तालुक्यात नव्याने तयार झालेल्या निंबवडे जिल्हा परिषद मतदारसंघात निंबवडे आणि घरनिकी अशी पंचायत समिती गण तयार करण्यात आलेले आहेत. जत तालुक्यातील करजगी जिल्हा परिषद मतदार संघात करजगी आणि तिकोंडी हे पंचायत समिती गण तयार करण्यात आलेले आहेत. माडग्याळ जिल्हा परिषद मतदारसंघात माडग्याळ आणि दरीबडची पंचायत समिती गण तयार करण्यात आलेला आहे. पूर्वी दरीबडची या नावाने जिल्हा परिषदेचा स्वतंत्र मतदारसंघ होता. वाळेखिंडी जिल्हा परिषद मतदार संघात वाळेखिंडी आणि कोसारी हे दोन पंचायत समितीचे गण तयार करण्यात आलेले आहेत. खानापूर तालुक्यात करंजी या जिल्हा परिषद गटात बलवडी आणि करंजे हे दोन पंचायत समितीचे गण तयार करण्यात आलेले आहेत.
तासगाव तालुक्यात नव्याने तयार झालेल्या कवठेएकंद जिल्हा परिषद मतदारसंघात कवठेएकंद आणि कुमठे हे दोन पंचायत समिती गण तयार करण्यात आलेले आहेत. रांजणी जिल्हा परिषद गटामध्ये रांजणी आणि हिंगणगाव हे दोन पंचायत समितीचे गण तयार करण्यात आलेले आहेत. सावंतपूर जिल्हा परिषद मतदारसंघात बांबवडे आणि सावंतपूर हे दोन गण तयार करण्यात आलेले आहेत. नेर्ले जिल्हा परिषद मतदार संघात साखराळे आणि नेर्ले हे दोन पंचायत समितीचे गण तयार झालेले आहेत. कुरळप जिल्हा परिषद मतदार संघात कुरळप आणि ऐतवडे बुद्रुक हे दोन गण तयार झालेले आहेत.
बहादूरवाडी जिल्हा परिषद मतदार संघात बहादूरवाडी आणि कोरेगाव हे दोन पंचायत समितीचे गण तयार झालेले आहेत. सागाव जिल्हा परिषद मतदारसंघात कंदूर आणि सागाव असे दोन पंचायत समितीचे गण तयार करण्यात आलेले आहेत. हरिपूर जिल्हा परिषद मतदार संघात हरिपूर आणि टाकळी हे दोन पंचायत समितीचे गण तयार झालेले आहेत. नांद्रे जिल्हा परिषद मतदार संघात नांद्रे आणि कर्नाळ हे दोन पंचायत समितीचे गण तयार झालेले आहेत.
जिल्हा परिषदेचे नवे मतदार संघ
तालुका जिल्हा परिषद गट
आटपाडी- निंबवडे
मिरज -नांद्रे
वाळवा -बहादूरवाडी, कुरळप, नेर्ले
शिराळा -सागांव
तासगाव- कवठेएकंद
पलूस- सावंतपूर
जत- वाळेखिंडी,-करजगी, माडग्याळ
खानापूर -करंजे