सांगरूळ /वार्ताहर
कॉफीन युक्त शीतपेय आरोग्यास अपायकारक असून अशा शीतपेयांची विक्री करण्यास बंदी घालण्याचा ठराव गावसभेत झाला असून अशा पेयांची विक्री गावात करू नये याबाबतची नोटीस सांगरूळ ग्रामपंचायत च्या वतीने गावातील सर्व दुकानदारांना दिली आहे . गावसभेच्या निर्णयानुसार ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या नोटीसीचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारावर कडक कारवाई करण्याचा इशारा सांगरूळ ग्रामपंचायतीच्या वतीने दिला आहे.
आज बाजारामध्ये विक्रीसाठी असणाऱ्या थंड पेयामध्ये कॅफिन वापरलेले अनेक थंडपेय आहेत कि जसे स्टिंग,फ्रेश एनर्जी चार्ज वगैरे अशा प्रकारच्या अनेक कंपन्या मार्केट मध्ये आहेत.गावामध्ये १८ वर्षाखालील लहान मुलांच्यामध्ये अशा
प्रकारचे थंड पेय पिण्याचे प्रमाण आढळून आले आहे.तरी अशा कॅफिनयुक्त थंड पेयापासून लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
या सर्व गोष्टीचा विचार करून अशा पेयापासून लहान मुलांच्या आरोग्यास निर्माण होणारा धोका व तरुणांच्या वाढणाऱ्या व्यसनाधिनता या गोष्टीना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत ग्रामसभा दि.१० मे २०२३ च्या ऐनवेळच्या विषयामध्ये अशा थंड पेयाच्या विक्रीवर बंदीचा ठराव झाला असून अशा प्रकारच्या कोणत्याही थंड पेयांची आपल्या गावामध्ये विक्री करू नये.तसेच या प्रकारच्या थंडपेयाची जाहिरात आपल्या दुकानासमोर करू नये.
तसेच अशी कॅफिनयुक्त थंडपेये विक्री करताना निदर्शनास आल्यास आपलेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा गावातील सर्व दुकानदारांना ग्रामपंचायत प्रशासनाने समक्ष भेटून नोटीसद्वारे दिला आहे . यावेळी सरपंच शितल खाडे ,उपसरपंच सुभाष सुतार, बदाम खाडे रवींद्र खाडे, सचिन नाळे ,सुरेखा तोरस्कर, रेषा आंबी, गीतांजली कासोटे, अश्विनी यादव, मधुरा खाडे यांचे सह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य कर्मचारी उपस्थित होते .