जोकोविच-सित्सिपस, साबालेन्का-रीबाकिना एकेरीत अंतिम फेरीत
वृत्तसंस्था/ मेलबर्न
भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाला अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत सानियाला रोहन बोपण्णासमवेत खेळताना मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला. पुरुष एकेरीत सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच व ग्रीसचा स्टेफानोस सित्सिपस यांनी अंतिम फेरी गाठली तर महिला एकेरीत आर्यना साबालेन्का व इलेना रीबाकिना यांच्यात आज शनिवारी जेतेपदासाठी झुंज होईल.
बिगरमानांकित सानिया मिर्झा व रोहन बोपण्णा यांना अंतिम फेरीत ब्राझीलच्या लुईसा स्टेफनी व राफाएल मॅटाओस यांच्याकडून 6-7 (2-7), 2-6 असा पराभव पत्करावा लागला. यातील पहिला सेट चुरशीचा झाला. पण दुसरा सेट ब्राझीलच्या जोडीने सहज जिंकत जेतेपद मिळविले. ‘माझ्या डोळय़ांत अश्रू आले असतील तर ते आनंदाश्रू असतील. पण यानंतरही दोन स्पर्धा मी खेळणार आहे. मात्र माझी व्यावसायिक कारकीर्द सुरू झाली ती मेलबर्नमधूनच,’ असे भावूक झालेली सानिया सामन्यानंतर म्हणाली. ‘मी 14 वर्षाची होते तेव्हा रोहनच माझा मिश्र दुहेरीचा पहिला जोडीदार होता. आम्ही त्यावेळी राष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती. 22 वर्षांपूर्वी आम्ही सुरुवात केली होती. रोहन माझा बेस्ट पेंड असून त्याच्यासोबत मी कारकिर्दीचा शेवट करतोय याचा आनंद होतो,’ असे म्हणताना तिने रोहनचे आभारही मानले. रोहनने आतापर्यंत प्रेंच ओपन स्पर्धेत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले आहे.
36 वर्षीय सानियाने दुबईत होणारी डब्ल्यूटीए स्पर्धा आपली शेवटची स्पर्धा असेल, असे जाहीर केले होते. ती भारताची सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू असून तिने सहा ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे पटकावली आहेत. त्यापैकी तीन मिश्र दुहेरीची आहेत. 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 मध्ये महेश भूपतीसमवेत पेंच ओपन आणि 2014 मध्ये ब्राझीलच्या बुनो सोआरेसमवेत अमेरिकन ओपनचे मिश्र दुहेरीत जेतेपद मिळविले. येथील रॉड लेव्हर एरिना हे तिच्यासाठी लकी कोर्ट ठरले असून त्यावर तिने महिला दुहेरी, मिश्र दुहेरीचे जेतेपद मिळविले तर चार वेळा उपविजेतेपद मिळविले आहे. त्यामुळे कारकिर्दीचा शेवट याहून चांगल्या ठिकाणी करता आला नसता, असे तिने म्हटले. यावेळी तिचा मुलगा इझहान, कुटुंबीय व मित्रमंडळी उपस्थित होती. कारा ब्लॅक ही आपली महिला दुहेरीची पहिली जोडीदार. ती माझी बेस्ट पेंड असून तिच्याशिवाय आपल्याला मोठी मजल मारता येऊ शकली नसती, अशी कृतज्ञ भावना सानियाने तिच्याबद्दल व्यक्त केली.
जोकोविच, सित्सिपस अंतिम लढत
पुरुष एकेरीत नोव्हॅक जोकोविच व सित्सिपस यांनी अंतिम फेरी गाठली. चौथ्या मानांकित जोकोविचने बिगरमानांकित अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 7-5, 6-1, 6-2 असा पराभव करून दहावे जेतेपद मिळविण्याच्या दिशेने पाऊल टाकले. येथे जेतेपद मिळविल्यास ते त्याचे 22 वे ग्रँडस्लॅम जेतेपद असेल. त्याचबरोबर अग्रस्थानावरही त्याला पुन्हा स्थान मिळेल. दुसऱया उपांत्य सामन्यात तिसऱया मानांकित सित्सिपसने रशियाच्या कॅरेन खचानोव्हचा 7-6 (7-2), 6-4, 6-7 (6-8), 6-3 असा पराभव करून पहिल्यांदाच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. जोकोविच व सित्सिपस यांच्यात रविवारी जेतेपदाची लढत होईल. जोकोविचचे त्याच्याविरुद्ध 10-2 असे रेकॉर्ड आहे. सित्सिपसने यापूर्वी 2021 मध्ये प्रेंच ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली होती. पण त्यावेळी जोकोविचने बाजी मारत जेतेपद पटकावले होते.
महिला एकेरीत पाचवी मानांकित साबालेन्काने पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठताना पोलंडच्या मॅग्डा लिनेटचा 7-6 (7-1), 6-2 असा पराभव केला. दुसऱया उपांत्य सामन्यात कझाखच्या इलेना रीबाकिनाने दुसऱया ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठताना माजी अग्रमानांकित व्हिक्टोरिया अझारेन्काचा 7-6 (7-4), 6-3 असा पराभव केला.