नवी दिल्ली
आयपीएस अधिकारी संजय अरोरा यांना दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त बनवण्यात आले आहे. अरोरा हे तामिळनाडू केडरचे 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते आज म्हणजेच 1 ऑगस्ट 2022 रोजी राकेश अस्थाना यांच्याकडून दिल्ली पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारतील. संजय अरोरा हे मूळचे जयपूर, राजस्थानचे रहिवासी आहेत. त्यांनी मालवीय नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, जयपूर (राजस्थान) येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये बॅचलरची पदवी संपादन केली आहे. 1988 मध्ये ते नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होत आयपीएस झाले. त्यानंतर त्यांना तामिळनाडू केडर मिळाले. तामिळनाडूतील अनेक जिल्हय़ांमध्ये त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावली आहे. तसेच त्यांनी स्पेशल टास्क फोर्सचे नेतृत्त्वही केले. यादरम्यान त्यांनी वीरप्पन टोळीविरोधात मोठी मोहीमही उघडली. या कामगिरीसाठी त्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
1991 मध्ये एनएसजीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर संजय अरोरा यांच्याकडे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती. त्या काळात तामिळनाडूमध्ये एलटीटीईच्या दहशतवादी कारवायांचा बोलबाला होता. मुख्यमंत्र्यांच्या जीवालाही धोका होता. याचदरम्यान अरोरा यांनी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची व्यवस्था केली. 1997 ते 2002 पर्यंत त्यांनी इंडो-तिबेट बॉर्डर पोलीसचे कमांडर म्हणूनही काम केले. यानंतर ते 2002 ते 2004 पर्यंत कोईम्बतूरचे पोलीस आयुक्तही होते. त्यांनी एडीजीपी ऑपरेशन्स आणि एडीजीपी प्रशासन ही पदेही भूषवली आहेत.