ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना शिवसेनेने पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती. ही ऑफर संभाजीराजेंनी धुडकावली. त्यामुळे शिवसेनेकडून संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. शिवसेना सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातूनच उमेदवार देणार असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांना ही संधी देण्याचा विचार शिवसेना करत आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या जागेसाठी कोणत्याही पक्षाकडे बहुमत नाही. त्यामुळे या जागेसाठी रस्सीखेच सुरू असून, संभाजीराजे यांनी अपक्ष लढण्याची हाक दिली आहे. त्यामुळे या जागेचा तिढा आणखी वाढला आहे. इतर पक्षांकडून पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा संभाजीराजे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली होती. मात्र शिवसेनेत प्रवेश केला तरच त्यांना उमेदवारी देता येईल अशी अट शिवसेनेने घातली होती. त्यानंतर शिवसेनेने दिलेल्या पक्षप्रवेशाच्या निमंत्रणाकडे संभाजीराजेंनी पाठ फिरवली. शिवसेनेने संभाजीराजेंना दिलेला अल्टीमेटम संपल्याने शिवसेनेने पुढची रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. कोणत्याही अपक्ष उमेदवाराला शिवसेना पाठिंबा करणार नाही. दोन्ही उमेदवार शिवसेनेचेच असतील, असा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे.
संभाजीराजेंनी सेनेची ऑफर नाकारल्याने संभाजीराजेंना शह देण्यासाठी कोल्हापूरमधून शिवसैनिकाला उमेदवारी देण्याची तयारी शिवसेनेनं सुरू केल्याची चर्चा आहे. सहाव्या जागेसाठी माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिरुरचे माजी खासदार आढळराव पाटील, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची नावे यापूर्वी चर्चेत होती. आता कोल्हापुरातील संजय पवार हे नाव चर्चेत आलं आहे.