आॅनलाईन टीम/तरूण भारत
मुंबई : शिवसेनेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवार कोण याचा तिडा सुटता सुटत नव्हता. मात्र कोल्हापुरातून शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मात्र शिवसेनेकडून याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. संजय पवार यांचे नाव आधी चर्चेत होत . मात्र कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. शिवसेनेकडून मराठा समाजाचा उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संजय पवार हे कट्टर मराठा असल्याने त्यांना उमेदवारी मिळाली आहे अशी चर्चा सुरु आहे. संभाजीराजेंकडून मुदतीनंतरही प्रतिसाद न मिळाल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे समजते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे थोड्याच वेळात घोषणा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यानंतर भाजप काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या बाजूने अपक्षांची मते असतात. या जोरावर आपला उमेदवार येईल असे शिवसेनेला वाटतंय. संभाजीराजे यांच्या उमेदवारीचे काय होणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण अपक्ष म्हणून त्यांना १० आमदारांच्या अनुमोदक म्हणून सह्या लागतात. महाविकास आघाडी अनुमोदक देणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणता पक्ष सह्या देणार यावरून त्य़ांची उमेदवारी अवलंबून आहे. भाजपाने जर तिसरा उमेदवार द्यायच ठरवलं तर निवडणूक लागू शकते. भाजपाने जर दोनच उमेदवार दिले तर ही निवडणूक बिनविरोध होवू शकते.