राहुल शेवाळे यांच्या नियुक्तीचा वाद आता कोर्टात
काल संजय राऊतांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदे गटात सामील होत वेगळा गट स्थापन केलेल्या १२ खासदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी केली. यावर राहुल शेवाळेंनी उत्तर दिले आहे. आम्ही गट नाही, आम्ही शिवसेनाच आहोत. पक्षप्रमुखांनी आमच्या मागणीची दखल घेतली नाही. प्रक्रियेनुसार गटनेतेपदाची निवड करण्यात आली आहे. संजय राऊत यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आम्ही फक्त गटनेत्याची प्रोसेस केली आहे. यासाठी सुप्रीम कोर्टात जेवढ्या केसेस आहेत त्याची कागदपत्र मिळून ५०० पानांचा एक अहवाल लोकसभा अध्यक्षांना दिला हे दुर्देवी आहे असेही ते म्हणाले.
शिवसेनेचा लोकसभेतील गटनेता बदलण्याचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. विनायक राऊत यांच्याऐवजी राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी निवड करण्याच्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयाला शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. याशिवाय लोकसभेत शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी केलेली नियुक्ती रद्द करावी आणि १२ बंडखोर खासदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी काल शिवसेनेच्या शिष्टमंडळानं लोकसभा अध्यक्षांकडे केली. तर दुसरीकडे शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केलीय.
यासंदर्भात बोलताना राहुलशेवाळे म्हणाले, गटाचा उल्लेख केला तर ६ खासदारांनाच धोका आहे. त्यामुळे भावना गवळी यांचा व्हिप ६ खासदारांनाही लागू होणार. शिवसेनेनं तीन पत्रं दिल्यानं अध्यक्षांकडे संभ्रम आहे. त्यामुळे आतापर्यंत जी पत्र गेली आहेत ती पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. त्यामध्ये आवश्यक असणाऱ्या खासदारांच्या सह्या नाहीत असा आरोपही केला आहे.