मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय राऊतांची माहिती
ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेनेचे राज्यसभेसाठी दोन उमेदवार निश्चित मानले जात असल्याने संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेना पाठिंबा देईल अशी शक्यता आता जवळपास मावळली आहे. संजय राऊत यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा संजय पवार (Sanjay Pawar) हेच शिवसेनेचे सहाव्या जागेवरील उमेदवार असतील, हे स्पष्ट केले. राज्यसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी शिवसेनेकडे (Shivsena) पुरेशी मतं आहेत. मी आणि संजय पवार लवकरच राज्यसभा निवडणुकीसाठीचा अर्ज भरू. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असतील, असे संजय राऊत यांनी सांगितले. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर आज मुंबईत पत्रकारांशी बोलतानाही माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांना भेटल्यानांतर संजय राऊत यांनी शिवसेनेचे सहाव्या जागेवरील उमेदवार हे संजय पवार असतील आणि लवकरच आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करू. यावेळी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे.
राऊत यांनी यावेळी बोलताना, आम्ही संभाजीराजे यांना शिवसेनेकडून उमेदवारी द्यायला तयार होतो. सहाव्या जागेसाठी लागणारी ४२ मते आमच्याकडे होती. पण आम्ही ही मतं अपक्ष उमेदवाराला कशी देणार, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. त्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संभाजीराजे आता मराठा संघटनांशी चर्चा करून पुढील रणनीती निश्चित करतील.