Sanjay Raut : देशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अवमान केला जातोय.कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर हल्ले करत आहेत. राज्यातील उद्योग गुजरातला पळवले जात आहे. या विरोधात सर्वांनी आता एकत्र यायला हवं, यासाठी छत्रपती संभाजी राजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांनीही एकत्र यावं अस आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.आज पत्रकरांशी संवाद साधताना त्यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यपालांचे वक्तव्य, कर्नाटकांच्या मुख्यमंत्र्यांचा दावा अशा अनेक मुद्यांवरून सत्ताधाऱ्यांविरूध्द विरोधक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमिवर राऊत यांनी सर्वांनी आता एकत्र यायला पाहिजे असं आवाहन केलं आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, छत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजे भोसले यांची भावना ही संपूर्ण राज्याची भावना आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीने एकत्रित येत शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला अल्टिमेटम दिला आहे. ज्यांना ज्यांना महाराजांवर श्रद्धा, स्वाभिमान आहे, त्या सर्वांनी या अन्यायाविरोधात एकत्र यावं असेही ते म्हणाले.

