ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत येऊन आम्हालाच आव्हान देत असाल तर आम्ही गप्प बसणार नाही. शिवसेना कार्यकर्ते मरायला आणि मारायला तयार आहेत. आमच्या मागे सीबीआय लावा, ईडी लावा, आम्हाला त्रास द्या आम्हाला काही फरक पडत नाही. सरकार असल्याने आमचे हात बांधलेले आहेत. लायकीप्रमाणे राहा. राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या धमक्या आम्हाला देऊ नका. सेनेला पुरुन उरण्यासाठी तुम्हाला 7 जन्म घ्यावे लागतील, असे खडे बोल शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी राणा दाम्पत्य आणि भाजपला सुनावले.
संजय राऊत सध्या नागपूरमध्ये आहेत. मुंबईत राणा दाम्पत्याने निर्माण केलेल्या तणावपूर्ण परिस्थितीसंदर्भात त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले, मुंबईत येऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही. मातोश्रीवर घुसण्याची कोणाचीही हिंमत नाही. जर असा प्रयत्न झालाच तर आम्हाला पोलीस संरक्षणाची गरज नाही. तुम्ही लक्ष्मण रेषा ओलांडाल तर शिवसेना तुमच्या घरापर्यंत पोहचेल.
तुम्हाला राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल तर करुन दाखवाच. आम्हाला धमकी देऊ नका. आमचे शिवसैनिक खंबीर आहेत. लायकीप्रमाणे रहा. ‘झुंडशाही’ला आम्ही झुंडशाहीप्रमाणे उत्तर देऊ शकतो. महाराष्ट्रात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी तुम्हाला सात जन्म घ्यावे लागतील. शिवसैनिक मरायला आणि मारायलाही तयार आहेत, असेही राऊत यावेळी म्हणाले.