खासदार उदयनराजे भोसले यांची टिका
प्रतिनिधी/ कराड
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्याच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी कराडात पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांची खिल्ली उडवली. संजय राऊत यांचा नामोल्लेख टाळत खासदार भोसले म्हणाले ज्यांनी कोणी हे चोरमंडळाचे वक्तव्य केले आहे त्यांनी स्वतःला आरशात पहावे. त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवशी बुधवारी कराडमध्ये ब बैलगाडय़ांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यावेळी उपस्थित होते.
राज्याच्या राजकारणात सध्या खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ सुरू आहे. राऊत यांनी बुधवारी बोलताना विधीमंडळाला चोरमंडळ असे संबोधले. यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी टिकास्त्र सोडले. त्यांनी राऊत यांचा नामोल्लेख टाळला. ते म्हणाले ज्यांनी कोणी हे वक्तव्य केले आहे त्यांचे नावही मी घेत नाही. मात्र त्यांनी स्वतःला आरशात पहावे. आरसा प्रत्येकाला आपले खरे रूप दाखवतो. त्यांनीही ते करावे आणि स्वताला पहावे म्हणजे त्यांना समजेल की विधीमंडळ की चोरमंडळ याचा अर्थ.