ऑनलाईन टीम/तरुण भारत
पत्राचाळ घोटाळा (Patrachal Scam) प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांची ईडीने तब्बल ९ तास चौकशी केली. रात्री ८ वाजता त्या ईडी (ED) कार्यालयातून बाहेर आल्या. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचा ईडीचा आरोप आहे. हे पैसे खात्यात आले कसे, याबाबत वर्षा राऊत यांची चौकशी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची पत्राचाळ जमीन घोटाळा घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची चौकशी शनिवारी झाली. तब्बल नऊ तास वर्षा राऊत यांची चौकशी सुरू होती. मुंबईतील ईडी कार्यालयात या दोघांची चौकशी झाली.
संजय राऊत आणि वर्षा राऊत यांच्या खात्यात प्रवीण राऊत (Pravin Raut) याने १ कोटी ६ लाख रुपये हस्तांतरित केले होते. याच पैशातून राऊतांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा दावा ईडीने केला आहे. ईडीकडून वर्षा यांच्या खात्यांची कसून तपासणी सुरू आहे. संजय राऊत, प्रवीण राऊत आणि एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान यांनी प्रकल्प पूर्ण न करता पैसे लाटल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुरू आशिष कन्स्ट्रक्शनच्या काही जणांना पाचारण करण्यात येणार असल्याचे समजते. पत्राचाळप्रकरणी संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी मध्यरात्री अटक करण्यात आली होती.
पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीने संजय राऊतांच्या घरी छापेमारी केली होती. त्यावेळी ईडीला राऊतांच्या घरातून काही कागदपत्रे मिळाली होती. त्यासंदर्भात वर्षा राऊत यांना प्रश्न विचारण्यात आल्याचे समजते. तसेच, प्रवीण राऊत यांच्याशी झालेल्या व्यवहारांची तुम्हाला माहिती होती का? तुमच्या खात्यात अनोळखी व्यक्तीकडून १ कोटी ६ लाख रुपयांचे व्यवहार झालेत हा अनोळखी व्यक्ती कोण? अलिबागमधील जमीन खरेदी आणि दादरमधील गार्डन कोर्ट इमारतीतील फ्लॅट तुमच्या नावे खरेदी करण्यात आला आहे, ही खरेदी प्रक्रिया कशी पार पडली? हे प्रश्न विचारण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, याआधीही म्हजेच जानेवारी महिन्यात वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीसाठी वर्षा राऊत या ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी केली होती.