प्रतिनिधी/ बेळगाव
‘शिपाई संजीवदादांकडून शिक्षणाला संजीवनी’ या मथळ्याखाली तरुण भारतने गोवावेस येथील न्यू गर्ल्स हायस्कूलच्या संजीव गावडे यांच्या कार्याची माहिती दिली होती. संजीवदादांनी आपल्या निवृत्ती वेतनातील सहा लाख रुपये मुलींच्या शिक्षणासाठी दिले. याची दखल घेऊन काकडे फौंडेशनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
संजीव गावडे 42 वर्षे न्यू गर्ल्स हायस्कूलमध्ये सेवा बजावीत होते. निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या पेन्शनची रक्कम शाळेच्या दोन वर्गखोल्या बांधण्यासाठी दिली. याची दखल घेऊन काकडे फौंडेशनतर्फे नितीन काकडे व किशोर काकडे यांनी गावडेदादांना शाल, सन्मान पत्र, फळे व भेटवस्तु देऊन त्यांचा सन्मान केला.
किशोर काकडे यांनी गावडेदादांचे कौतुक करत मुलींच्या शिक्षणाला हातभार लावल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मुख्याध्यापक जे. यू. घाडी, एस. एम. सावंत उपस्थित होते. एम. के. गुरव यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी व सहशिक्षक उपस्थित होते.