25 तास पाण्यावर तरंगण्याच्या उपक्रमास प्रारंभ : विविध ग्रुपसह 25 जलतरणपटू साथ देणार : आज सांगता होणार
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
आंतरराष्ट्रीय योग दिन व आजादी का अमृतमहोत्सव यांचे औचित्य साधून योगतज्ञ संजीव हंचिनमनी यांच्याकडून सलग 25 तास पाण्यावर तरंगण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे.
केएलई जेएनएमसी जलतरण तलावात योगासनाद्वारे 25 तास पाण्यावर तरंगण्याच्या उपक्रमाला सोमवार दि. 20 रोजी सायंकाळी 4.30 वा. प्रारंभ झाला. याचे उद्घाटन एमएलसी साबण्णा तलवार व केएलई काहेरचे रजिस्ट्रार डॉ. व्ही. ए. कोठीवाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तलवार म्हणाले, सध्या जीवनात योगाचे महत्त्व वाढले आहे. योगासनामुळे कित्येक आजार दूर झाले आहेत. माणसाला सध्या जगण्यासाठी योग साधनेची गरज भासत असून नियमित योग काळाची गरज आहे. पाण्यामध्ये योगासन करण्यामुळे आपणाला वेगळे परिणाम दिसून येतात, असे सांगत त्यांनी संजीव हंचिनमनी यांना शुभेच्छा दिल्या.
योगासनामुळे अनेक फायदे
यावेळी डॉ. व्ही. ए. कोठीवाले म्हणाले, योगदिनाचे औचित्य साधून संजीव हंचिनमनी यांनी योगसाधना करीत 25 तास पाण्यावर तरंगण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्याला केएलई काहेरतर्फे शुभेच्छा देऊन वैद्यकीय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अशा प्रकारची जलतरण योगासने करण्याची आपण माहिती देणार आहोत. त्याचा सरावही पुढील काळात आपण करणार आहोत. योगासनामुळे अनेक फायदे होतात. वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यासातून तणावमुक्त राहण्यासाठी योग त्याचप्रमाणे जलतरण याची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याची सूचना त्यांनी केली.
संजीव हंचिनमनी यांचा सत्कार
या उपक्रमाला सायंकाळी 4.30 वा. मान्यवरांच्या हस्ते संजीव हंचिनमनी व सहयोगी जलतरणपटू अद्वैत दळवी व वेदांत मिसाळ यांचा सत्कार करून सुरुवात करण्यात आली. संजीव हंचिनमनी यांनी पाण्यात निद्रासन, अनुरागासन व इतर आसनांची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी स्विमर्स क्लबच्या अध्यक्षा लता कित्तूर, उमेश कलघटगी, सुधीर कुसाणे, इंद्रजीत हलगेकर, अजिंक्य मेंडके, अक्षय शेरेगार, गोवर्धन काकतीकर, नितेश कुडुचकरसह डॉल्फीन ग्रुप उपस्थित होता.
या उपक्रमावेळी काहेर जेएनएमसी ग्रुप, एसीई ग्रुप, योगासन ग्रुप, संकल्पना योगासन ग्रुप, माहेश्वरी अंध शाळा गट, असोसिएशन ऑफ फिजिकली हॅन्डिकॅप्ड ग्रुपसह 25 जलतरणपटू त्यांना साथ देणार आहेत. मंगळवार दि. 21 रोजी सायंकाळी 5.30 वा. या उपक्रमाची सांगता होणार असून, यावेळी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.