आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून उपक्रम
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
आंतरराष्ट्रीय योग दिन व आझादी का अमृत महोत्सव यांचे औचित्य साधून योगतज्ञ संजीव हंचिनमनी सलग 25 तास योगासनाचे प्रकार करत पाण्यावर तरंगण्याचा उपक्रम पूर्ण करीत विक्रम स्थापन केला.
केएलई सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात या 25 तास योगासनाद्वारे पाण्यावर तरंगणाच्या उपक्रमाला सोमवार दि. 20 रोजी सायंकाळी 4.30 वा. सुरूवात केली होती. मंगळवारी. 21 रोजी सायंकाळी 5.30 वा. संजीव हंचिनमनी यांनी उपक्रम पूर्ण करून विक्रम स्थापित केला आहे. या उपक्रमानंतर उपस्थित जलतरणपटू, प्रेक्षक व प्रमुख पाहुण्यांनी संजीव यांचे अभिनंदन केले. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, योग करो जीवन बढावो, अशा घोषणा देण्यात आल्या. उपक्रमानंतर प्रमुख पाहुणे केएलई जेएनएमसी विद्यापीठाचे उपकुलगुरू विवेक सावजी, काहेरचे रजिस्ट्रार डॉ. व्ही. ए. कोठीवाले, कृष्णकुमार जेल, स्विमर क्लबच्या अध्यक्षा लता कित्तुर, उपाध्यक्ष जी. एस. बेलकेरी यांनी संजीव हंचिनमनींचे कौतुक केले. यावेळी त्यांना स्मृतीचिन्ह व चषक देवून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपकुलगुरू विवेक सावजी यांनी योगदिनाचे औचित्य साधून संजीव हंचिनमनीनी केलेल्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले.
निरोगी व बळकट आरोग्यासाठी योग व जलतरणाची आवश्यकता आहे. यासाठी वेळ देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी उमेश कलघटगी, सुधीर कुसाने, इंद्रजीत हलगेकर, अजिंक्य मेंडके, अक्षय शेरेगार, गोवर्धन काकतीकर, नितेश कुडुचकर, सुधीर किल्लेकरसह डॉल्फिन ग्रुप उपस्थित होते.
या उपक्रमावेळी काहेर जेएनएमसी ग्रुप, एसीई ग्रुप, योगासन ग्रुप, संकल्पना योगासन ग्रुप, माहेश्वरी अंध शाळा गट, असोसिएशन ऑफ फिजिकली हॅन्डिकॅप्ड ग्रुपसह इतर 25 जलतरणपटूंनी त्यांना साथ दिली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जलतरणपटू व काहेरच्या सभासदांनी परिश्रम घेतले.