बाजारात ख्रिसमसचे साहित्य दाखल, खरेदीची रेलचेल : ख्रिश्चन बांधवांत उत्साह
प्रतिनिधी/ बेळगाव
ख्रिसमस नाताळ अगदी 10 ते 12 दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारात ख्रिसमसचे विविध साहित्य दाखल झाले आहे. त्यामुळे बाजारपेठ ख्रिसमसच्या साहित्यांनी बहरताना दिसत आहे. आकर्षक ट्री, विद्युत माळा, ख्रिसमस स्टीकर, जिंगल बेल, विविधरंगी स्टार आदी साहित्य आकर्षित करीत आहे. दरम्यान ख्रिश्चन बांधवांकडून खरेदीची देखील रेलचेल पाहायला मिळत आहे.
ख्रिसमससाठी बाजारात विविध सजावटीचे साहित्य दाखल झाले आहे. गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, मेणसे गल्ली आदी ठिकाणी साहित्य पाहायला मिळत आहे. विशेषत: कॅम्प परिसरात देखील ख्रिसमसची तयारी पाहायला मिळत आहे. त्याबरोबर चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांकडून तयारीला वेग आला आहे. यानिमित्ताने घराला रंगरंगोटी करणे, आकर्षक सजावट करणे यासाठी ख्रिश्चन बांधवांची धडपड सुरू आहे. विशेषत: लहान मुलांसाठी बाजारात सांताक्लॉजची आकर्षक खेळणी, अंगणात मांडण्यासाठी आकर्षक ख्रिसमस ट्री व विविधरंगी शोभेच्या वस्तू देखील ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.
याबरोबरच खास ख्रिसमस स्पेशल गिफ्ट सुद्धा विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यांना देखील ग्राहकांची पसंती दिसून येत आहे. याबरोबरच विविध आकारातील स्टार देखील आकर्षित करीत आहेत. मागील दोन वर्षात कोरोनामुळे निर्बंध आले होते. मात्र यंदा ख्रिसमस, नाताळाच्या खरेदीला उधाण आल्याचे दिसत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये ख्रिसमसच्या खरेदीला ख्रिश्चन बांधवांची वर्दळ पाहायला मिळत आहे.
तऊणाईला थर्टीफस्टचे वेध
ख्रिसमस पाठोपाठ 31 डिसेंबर देखील जवळ आल्याने तरुणाईला थर्टीफस्टचे वेध लागले आहेत. या दिवशी पार्ट्यांचे आयोजन करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. मागील दोन वर्षात 31 डिसेंबरवर मर्यादा आल्या होत्या. मात्र यंदा सर्व सुरळीत सुरू झाल्याने यंदाचा 31 डिसेंबर धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी तरुणाई आतूर झाली आहे.