वृत्तसंस्था /किंग्जस्टन (जमैका)
येथील सबिना पार्क मैदानावर बुधवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने यजमान विंडीजचा 13 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत विजयी सलामी दिली. न्यूझीलंडच्या विजयामध्ये सँटनरची चमकदार कामगिरी झाली. त्याने 19 धावात 3 गडी बाद केले.
या सामन्यापूर्वी पावसाच्या तुरळक सरी पडल्या होत्या. दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकात 5 बाद 185 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 20 षटकात 7 बाद 172 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 13 धावांनी गमवावा लागला.
न्यूझीलंडच्या डावामध्ये कॉनवेने 29 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 43, कर्णधार विल्यम्सनने 33 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 47, ग्युप्टिलने 17 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 16, फिलिप्सने 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 17, डॅरील मिचेलने 12 चेंडूत 1 षटकारासह 16, नीशमने 15 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद जलद 33 धावा झोडपल्या.
ग्युप्टिल आणि कॉनवे यांनी सलामीच्या गडय़ासाठी 62 धावांची भागीदारी केली. कर्णधार विल्यम्सन आणि मिचेल यांनी चौथ्या गडय़ासाठी 46 धावांची भर घातली. न्यूझीलंडच्या डावामध्ये 9 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे ओडेन स्मिथने 32 धावात 3 तर जेसॉन होल्डर आणि मॅकॉय यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावात सलामीच्या बुक्सने 43 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 42, कर्णधार पुरनने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 15, जेसॉन होल्डरने 3 चौकारांसह 25, पॉवेलने 2 षटकारांसह 18, शेफर्डने 16 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 31, ओडेन स्मिथने 12 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 27 धावा जमविल्या. विंडीजच्या डावामध्ये 10 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. शेफर्ड आणि स्मिथ यांनी आठव्या गडय़ासाठी अभेद्य 58 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडतर्फे सामनावीर सँटनरने 19 धावात 3 तर बोल्ट, साऊदी, फर्ग्युसन आणि सोधी यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.