ऑनलाईन टीम / मुंबई :
जगविख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. (santoor maestro pandit shivkumar sharma passes away) ते 84 वर्षांचे होते. मागील सहा महिन्यांपासून ते किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
संतूर या काश्मीरमधील लोकवाद्याला अभिजात संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून देण्यात पंडित शिवकुमार यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी या वाद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून दिली. भारतीय चित्रपट संगीतातही त्यांनी फार मोठी कामगिरी बजावली. शिवकुमार शर्मा हे उत्तम गायकही होते. त्यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 1986 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1991 मध्ये ‘पद्मश्री’ तर 2001 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलं होतं. 1985 मध्ये पंडित शिवकुमार शर्मा यांना बाल्टिमोर या संयुक्त राज्याचं मानद नागरिकत्वही प्रदान करण्यात आलं आहे.
बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरची त्यांची जोडी खूप गाजली. ‘सिलसिला’ या चित्रपटाला हरिप्रसाद चौरसिया यांच्या बरोबर त्यांनी दिलेले संगीत रसिकांच्या सतत आठवणीत राहणारे ठरले. ही जोडी ‘शीव-हरी’ या नावाने ओळखली जायची. 1967 मध्ये ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा अल्बम तुफान लोकप्रिय झाला होता. या जोडीने अनेक सिनेमांना संगीतबध्द केले असून, यश चोप्रांचा ‘सिलसिला’ (1980) हा त्यांचा पहिला सिनेमा होता. त्यानंतर या जोडीने ‘फासले’ (1985), ‘चांदणी’ (1989), ‘लम्हे’ (1991), ‘डर’ (1993) या सिनेमांनाही संगीत दिलं. दरम्यान, शिवकुमार त्यांच्या पश्चात पत्नी मनोरमा आणि मुलगा राहुल शर्मा असा परिवार आहे.