पणजी : ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (ऱ्थ्श्) या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण कारागिरांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी ‘सरस मेळा’च्या माध्यमातून तयार बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहन आणि समर्थन करण्यात येत आहे. भारतातील विविध राज्यांतील ग्रामीण कारागीर राज्य समन्वयकांसह सरस मेळ्यात सहभागी होतात, यंदाचा हा सरस मेळा राज्य सरकारतर्फे मडगाव येथील एसजीपीडीए मैदानावर 23 मार्च ते 3 एप्रिल या दरम्यान होणार आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गोविंद गावडे यांनी दिली. पणजी येथील संस्कृती भवनाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला प्रकल्प अधिकारी सुयश खांडेपारकर, प्रकल्प संचालक प्रवीण बराड उपस्थित होते.
या सरस मेळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सन्मानीय अतिथी म्हणून ग्रामीणविकास मंत्री गोविंद गावडे, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर, (माननीय खासदार, राज्यसभा, गोवा राज्य), मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, राज्याचे मुख्य सचिव पुनीत गोयल, कला आणि संस्कृती खात्याचे सचिव मेनिनो डिसोझा, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत सदस्या सुवर्णा तेंडुलकर आदी उपस्थित राहणार आहेत. मंत्री गावडे म्हणाले, गोवा हे पर्यटन राज्य असल्याने मोठ्या प्रमाणात स्थानिक तसेच परदेशी पर्यटक राज्याला भेट देतात. त्यामुळे सरस महोत्सवात ठेवण्यात येणाऱ्या कारागिरांच्या उत्पादनांची पर्यटकांकडून प्रशंसा केली जाते आणि त्यांची खरेदी केली जाते. सरस महोत्सवाच्या माध्यमातून कारागिरांना तयार बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. या सरस महोत्सवात गोव्यासह आंध्र प्रदेश, आसाम, अऊणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, पाँडेचेरी या विविध राज्यांतील कारागीर , पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आदी राज्याचे कारागिर आपल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करणार आहेत.
कारागिरांचे 250 स्टॉल असणार
सरस महोत्सवात गोव्यासह इतर राज्यांच्या कला आणि हस्तकला, मातीच्या वस्तू, सलवार, चुडीदार, साड्या, टेराकोटा वस्तू, ज्यूट वर्क्स, बांबूची कामे, भरतकाम आदी गोव्यातील ग्राहकांना आणि पर्यटकांना स्वरोजगारीने बनवलेल्या अप्रतिम वस्तू निवडण्याची संधी प्राप्त होणार आहे. या महोत्सवात एकूण 400 कारागिर उपस्थित राहण्याची शक्यता असून, या महोत्सवात सुमारे 250 स्टॉल राहतील, असे मंत्री गोविंद गावडे म्हणाले.
सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन
सरस महोत्सवानिमित्त 23 मार्च ते 3 एप्रिल या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात विविध गटांसाठी गायन, नृत्य आणि पॅन्सी डेसमधील स्पर्धा होतील. हे सर्व कार्यक्रम महोत्सव काळात संध्याकाळी 7.00 ते रात्री 9.45 या वेळेत घेण्यात येतील, असे प्रकल्प संचालक प्रवीण बराड यांनी सांगितले.