Chhagan Bhujbal: “मी कोणाचेही फोटो काढा आणि लावा असं म्हटलं नव्हतो. माझ्या वक्तव्याचा राजकीय मुद्दा बनवला जातोय. मी सुद्धा हिंदू आहे. नाशिकमधील अनेक मंदिरांची कामे केलीय. कुंभमेळ्यासाठीही भरपूर काम केलं आहे. माझ्या घरीसुद्धा देवदेवतांची पूजा होते. सर्वजण देवीच्या दर्शनाला जातो. कोणत्या कुटुंबात देवाची पूजा करता हा ज्याचा त्याचा विषय आहे, पण शाळेत महापुरुषांचे फोटो बाजूला ठेवून देवीची पूजा करणे योग्य नाही इतकेच माझे म्हणणे आहे”,असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिलं आहे. शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
स्पष्टीकरण देताना छगन भुजबळ म्हणाले की, माझ्या वक्तव्याचे राजकारण करण्यात येत आहे. समता परिषदेच्या कार्यक्रमात मी माझं मत मांडलं होतं आणि प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. शाळेत पहिल्या दिवशी सरस्वतीची पूजा करतो. पण छत्रपती शिवाजी महाराजा, ज्योतिबा फुले, अण्णासाहेब कर्वे आदी महापुरुषांची पूजा करत नाही. ते आपले देव आहेत, त्यांची पूजा का करत नाही. या लोकांनी आपल्या शिक्षणाची दारे उघडली. त्यांना विरोध सहन करावा लागला. तशाही परिस्थितीत शिक्षणाची दारे आपल्याला उघडी केली. आपण त्यांची पूजा करण्याऐवजी सरस्वती देवीची पूजा करतो. त्यामुळे देवीच्या ऐवजी महापुरुषांची पूजा करावी इतकंच सांगण्याचा माझा उद्देश होता असं भुजबळ म्हणाले.

