Tarun Bharat

सर्फराजचे शतक, मुंबई सर्वबाद 374

मध्यप्रदेशविरुद्ध रणजी फायनल : गोलंदाजीत गौरव यादव-अनुभव अगरवालचे एकत्रित 7 बळी, प्रत्युत्तरात दुसऱया दिवसअखेर मध्यप्रदेशची 1 बाद 123 धावांपर्यंत मजल

वृत्तसंस्था /बेंगळूर

Advertisements

सर्फराज खानने (243 चेंडूत 134 धावा) हंगामातील चौथे शतक झळकावल्यानंतर मुंबईने मध्यप्रदेशविरुद्ध रणजी क्रिकेट स्पर्धेतील अंतिम लढतीत पहिल्या डावात सर्वबाद 374 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात दुसऱया दिवसअखेर मध्यप्रदेशने 1 बाद 123 धावा जमवल्या. सलामीवीर यश दुबे 131 चेंडूत 6 चौकारांसह 44 तर तिसऱया स्थानावर फलंदाजीला उतरलेला शुभम शर्मा 65 चेंडूत 6 चौकारांसह 41 धावांवर खेळत आहेत.

सर्फराजने आपल्या 134 धावांच्या बहारदार खेळीत 13 चौकार व 2 षटकार फटकावले आणि यामुळे मुंबईला 5 बाद 248 या मागील धावसंख्येवरुन डावाला सुरुवात केल्यानंतर सन्मानजनक धावसंख्येच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचता आले. त्याने डावखुरा फिरकीपटू कुमार कार्तिकेयला स्क्वेअर लेगवरुन तर ऑफस्पिनर सारांश जैनला पुढे सरसावत षटकार फटकावले. दरम्यान, दिवसअखेर 1 बाद 123 धावांपर्यंत मजल मारत मध्यप्रदेशनेही मुंबईला चोख प्रत्युत्तर दिले. यश दुबे (नाबाद 44) व शुभम शर्मा (नाबाद 41) यांनी दुसऱया गडय़ासाठी 76 धावांची अभेद्य भागीदारी साकारली.

दिवसातील पहिल्या सत्रात सर्फराजने जोरदार वर्चस्व गाजवले. या हंगामात त्याने आतापर्यंत केवळ 6 सामन्यातच 937 धावांची आतषबाजी केली असून मुंबईला या निर्णायक सामन्यात दुसऱया डावात फलंदाजी लाभली तर त्याला हंगामात 1 हजार धावांचा टप्पा सर करण्याची संधी मिळेल. गुरुवारी शम्स मुलानीला गौरव यादवने (4-106) दिवसातील पहिल्याच षटकात पायचीत केले. सर्फराजने मात्र आपला धडाका कायम ठेवत चौफेर फटकेबाजीवर भर दिला. कारकिर्दीच्या प्रारंभी अनेकदा शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागलेल्या या युवा फलंदाजाने आता प्रगल्भतेच्या दिशेने वाटचाल कायम राखली आहे.

सर्फराजचे वडील नौशाद खान हेच त्याचे प्रशिक्षक असून सराव सत्रात किमान 400 चेंडू (साधारणपणे 67 षटके) खेळावेत, यावर त्यांनी भर दिला. याचा या खेळीत सर्फराजला बराच लाभ झाला असेल. पृथ्वी शॉप्रमाणे सर्फराजची फलंदाजी नजाकतदार जरुर नव्हती. पण, धावफलक सातत्याने हलता ठेवण्यात आणि खराब चेंडू सीमापार पिटाळण्याच्या आघाडीवर त्याने वरचष्मा राखला. एक वेळ तर सर्फराजचे चौकार रोखण्यासाठी मध्यप्रदेशचा कर्णधार आदित्य श्रीवास्तवला क्षेत्ररक्षण विखरून लावणे भाग पडले. पण, यानंतरही सर्फराजने डीप एक्स्ट्रा कव्हर व डीप पॉईंटमधून चौकार मिळवले होते.

नव्वदीत प्रवेश केल्यानंतर त्याने मारलेला टिपिकल टी-20 चा स्कूप डोळय़ाचे पारणे फेडणारा ठरला. तो 97 धावांवर पोहोचला असताना श्रीवास्तवने पुन्हा एकदा सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ तैनात केले. यात लाँगऑन व लाँगऑफचा समावेशही होता. मात्र, इतके सर्व प्रयत्न सर्फराजचे शतक अजिबात रोखू शकले नाहीत. त्याने गोलंदाजाच्या डोक्यावरुन चेंडू फटकावत चौकार वसूल केला आणि हवेत झेपावत शतकाचा आनंद थाटात साजरा केला. 

सर्फराजने डावादरम्यान 4 छोटय़ा मात्र परिणामकारक भागीदारी साकारल्या. त्याने तनुष कोटियनसमवेत (15) सातव्या गडय़ासाठी 40, धवल कुलकर्णीसमवेत (1) आठव्या गडय़ासाठी 26, तुषार देशपांडेसमवेत (6) नवव्या गडय़ासाठी 39 तर मोहित अवस्थीसह (7) शेवटच्या गडय़ासाठी 21 धावांची अनमोल भागीदारी साकारल्या. तो मुंबईच्या डावात बाद होणारा शेवटचा फलंदाज ठरला.

सर्फराजचे शतक आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे ते वक्तव्य!

सध्या भारतीय कसोटी संघाची मध्यफळी जॅम-पॅक आहे. मात्र, सर्फराजचे या हंगामातील फलंदाजीतील सातत्य पाहता ‘खेळाडूंनी निवड समितीचे दरवाजे फक्त वाजवू नये तर ठोठावले पाहिजेत,’ हे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे वक्तव्य आठवणे साहजिक ठरते.

संक्षिप्त धावफलक

मुंबई पहिला डाव : 127.4 षटकात सर्वबाद 374 (सर्फराज खान 243 चेंडूत 13 चौकार, 2 षटकारांसह 134, यशस्वी जैस्वाल 163 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह 78, पृथ्वी शॉ 79 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 47, हार्दिक तमोरे 24. अवांतर 6. गौरव यादव 106 धावात 4 बळी, अनुभव अगरवाल 3-81, सारांश जैन 2-47, कुमार कार्तिकेय 1-133).

मध्यप्रदेश पहिला डाव : 41 षटकात 1 बाद 123 (यश दुबे 131 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 44, शुभम शर्मा 65 चेंडूत 6 चौकारांसह 41, हिमांशू मंत्री 50 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 31. अवांतर 7. तुषार देशपांडे 1-31).

Related Stories

इंग्लिश प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूडना डच्चू

Patil_p

अंकिता, दिविज शरण यांचे ‘अर्जुन’साठी नामांकन होणार

Patil_p

पीव्ही सिंधू उपांत्य फेरीत

Patil_p

सर्बियातील बुद्धिबळ स्पर्धेत निहाल सरीन विजेता

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया महिलांची मालिका स्थगित

Patil_p

पाकचा एकतर्फी मालिकाविजय

Patil_p
error: Content is protected !!