देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद : न्यू एज्युकेशनल इन्स्टिटय़ूट द्वितीय, तर युनियन हायस्कूल तृतीय
प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडे रवींद्र भवनमध्ये शुक्रवारी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडतर्फे आयोजित करण्यात आलेली देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा मोठय़ा उत्साहात होऊन त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील पहिले बक्षीस सर्वोदय एज्युकेशनल सोसायटी हायस्कूल कुडचडे, तर दुसरे न्यू एज्युकेशनल इन्स्टिटय़ूट कुडचडे व तिसरे बक्षीस युनियन हायस्कूल, सांगे यांना प्राप्त झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त शिक्षक विठ्ठल आवदियेंकर, अमित प्रतापराव भोसले, समृद्धी थळी, शिवराय तुकाराम फोंडेकर, लोकमान्य सोसायटीचे रिजनल मॅनेजर सुहास खांडेपारकर, प्रदीप चोडणकर व इतर मान्यवर उपस्थित होते. आज आपण सर्व स्वतंत्र देशात आनंदात राहत आहोत. त्याचा मोठा संबंध या समूह शब्दाशी आहे. कारण स्वातंत्र्याच्या अगोदर महात्मा गांधींनी लोकांना एकत्र करून एकजुटीने इंग्रजांना हाकलून लावण्याचा संदेश दिला. अशाच प्रकारे कोणत्याही व्यासपीठावर जेव्हा एखादा समूह सादरीकरण करतो तेव्हा त्यातील प्रत्येक घटक त्या सादरीकरणाचा भागीदार होतो आणि त्यामुळे त्या सादरीकरणाला एक वेगळे स्वरूप प्राप्त होऊन त्याचा आनंद उपस्थितांना लाभतो, असे विठ्ठल आवदियेंकर यावेळी म्हणाले.
किरण ठाकुर यांच्या विचारांत देशप्रेम
असा हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल लोकमान्य सोसायटी व त्यांचे संस्थापक अध्यक्ष तथा दै. ‘तरुण भारत’ समूहाचे प्रमुख किरण ठाकुर यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. कारण देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून दिसून येते की, त्यांच्या विचारांत देशप्रेम भरलेले आहे, असे उद्गार आवदियेंकर यांनी पुढे काढले.
स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सदर स्पर्धेत कुडचडे, पंचवाडी, सावर्डे, सांगे या भागांतील विद्यालयांच्या पथकांनी भाग घेतला. त्यात युनियन हायस्कूल सांगे, चंद्रभागा तुकोबा नाईक स्कूल कुडचडे, स्कूल ऑफ सिम्बॉसिस कराय-शिरोडा, न्यू एज्युकेशनल इन्स्टिटय़ूट कुडचडे, शारदा इंग्लिश हायस्कूल सावर्डे, गार्डियन एंजल हायस्कूल कुडचडे, मिरेकल हायस्कूल सांगे, सर्वोदय एज्युकेशनल सोसायटी हायस्कूल कुडचडे व न्यू इंग्लिश हायस्कूल दिगास-पंचवाडी या हायस्कुलांतील पथकांनी भाग घेतला. सदर गटांनी उत्तमरीत्या विविध देशभक्तीपर गीते सादर केली.
मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक दीपप्रज्वलन करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. विठ्ठल आवदियेंकर यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण झाले, तर रिजनल मॅनेजर खांडेपारकर यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र प्रदान केले. अमित भोसले, समृद्धी थळी व शिवराय फोंडेकर यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘लोकमान्य’च्या केपे शाखेच्या व्यवस्थापिका दिया नाईक यांनी केले, तर गार्डियन एंजल हायस्कूलची विद्यार्थिनी प्रस्तुती शेटय़े हिने आभार मानले.