चैत्र यात्रेस प्रारंभ : वाडीरत्नागिरीचा डेंगर भाविकांनी फुलला
वार्ताहर / जोतिबा डोंगर
श्रीक्षेत्र वाडीरत्नागिरी जोतिबा डोंगरावर दख्खनचा राजा केदारनाथ तथा जोतिबाच्या चैत्र यात्रेस मंगळवारी कामदा एकादशीपासून प्रारंभ झाला. जोतिबा डोंगरावर भाविक सासनकाठय़ा घेऊन दाखल होऊ लागले आहेत. बेळगावच्या चव्हाट गल्लीची मानाची सासनकाठी डोंगरावर दाखल झाली. जोतिबाच्या नावानं चांगभलंचा अखंड गजर, यामुळे वातावरण मंगलमय व उत्साहमय बनत आहे. जोतिबाची मुख्य यात्रा शनिवार दि. 16 एप्रिल रोजी होत आहे.
परंपरेनुसार मंगळवारी कामदा एकादशीदिवशी बेळगाव येथील चव्हाट गल्ली व नार्वेकर गल्लीतील सासनकाठय़ा नंदी, नगारा, बैलगाडय़ा, डोक्यावर जोतिबाची चांदीची मूर्ती घेऊन निगवे दुमाला, कुशीरे फाटामार्गे गायमुख तलावाशेजारी असणाऱया श्रीशैल्य मल्लिकार्जुन मंदिरात दर्शन घेऊन दक्षिण दरवाजामार्गे, मंदिराच्या आवारात दाखल झाल्या. जोतिबा ग्रामस्थांनी या भाविकांचे स्वागत व मानपान केले. त्यांनी पारंपरिक पद्धतीने मंदिराभोवती सासनकाठीच्या पाच प्रदक्षिणा काढून सर्व देवदेवतांचे दर्शन घेतले. यावेळी भक्तांनी चांगभलंचा गजर व गुलाल खोबऱयाची मोठी उधळण केली. दरम्यान, लातूर, बार्शी, सोलापूर, पंढरपूर, बीड, सातारा परिसरातील काही सासनकाठय़ाही खासगी वाहने व एसटी बसने दिवसभरात डोंगरावर दाखल झाल्या. त्यामुळे डोंगर परिसर भाविकांनी फुलला आहे. भाविकांना श्रम परिहार म्हणून गूळ, पाणी, चुरमुरे, लाडू, सरबत देण्याची व्यवस्था काही दानशूर भाविकांनी केली आहे. जोतिबाची कामदा एकादशीनिमित्त सुवर्णालंकारित खडी राजेशाही महापूजा बांधण्यात आली होती. ही महापूजा श्रीचे पुजारी निलेश फुकटे, अक्षय ठाकरे, महालिंग शिंगे, उत्तम भिवदर्णे यांनी बांधली.