‘चंद्रकांत जाधव अमर रहे…चा जयघोष ; कातळगेवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार,
वार्ताहर/ पुसेगाव
कातळगेवाडी (ता.खटाव) येथील वीर जवान हवालदार (144 एअर डिफेन्स) चंद्रकांत प्रभाकर जाधव यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी 11 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर जवान चंद्रकांत यांच्या पार्थिवाची ‘भारतमाता की जय, वीर जवान अमर रहे’ च्या जयघोषात अत्ययात्रा काढण्यात आली. अत्यंत शोकाकुल वातावरणात वीर जवान चंद्रकांत जाधव यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
देशसेवेची परंपरा लाभलेल्या कै. चंद्रकांत जाधव यांच्या घरातील वडील व दोन भाऊ आर्मीत होते. भाऊ सेवानिवृत्त होऊन दोन तीन वर्षे झाली. चंद्रकांत यांनी 21 वर्ष देश सेवा केली, वास्तविक त्यांनी 18 वर्षे सेवा केल्यानंतर पुन्हा तीन वर्षे देशसेवा करण्याची इच्छा व्यक्त केल्याने सेवेत आणखी वाढ झाली होती, त्यांच्या सेवानिवृत्तीला केवळ सहा महिने अवधी होता. सध्या त्यांची पोस्टिंग चंदी मंदिर पंजाब येथे होती. ते एक महिना सुट्टीवर आल्याने गेल्या मंगळवारी घरातील मंडळींनी जागरण, गोंधळ, सुवासनी आदी धार्मिक कार्यक्रम आटोपले होते. गुरुवारी कै. चंद्रकांत हे आपल्या कामावर हजर होण्यासाठी रेल्वेने निघाले होते. प्रवासा दरम्यान इटारसी जवळ त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती गावाकडे कळवण्यात आली.
वीर जवान चंद्रकांत जाधव त्यांच्या पश्चात आई-वडील तीन भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कातळगेवाडीसह खटाव तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शोकाकुल वातावरणात यांच्यावर शासकीय इतमामात बंदुकीच्या तीन फैरी झाडून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. या वीर जवानास अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी लष्करातर्फे व पुसेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप शितोळे यांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वज सन्मानाने कुटुंबाकडे देण्यात आला. सातारा पोलिसानी यांना श्रद्धांजली वाहिली. आमदार महेश शिंदे यांनी शोकसंदेश पाठवून तर श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव, बुधचे सरपंच अभयराजे घाटगे, भरत मुळे यांनी श्रद्धांजली वाहिली.
रस्त्यावर काढल्या रांगोळ्या
रविवारी सकाळी पुण्याहून त्यांचे पार्थिव राहत्या घरासमोर आणण्यात आले. यावेळी चंद्रकांत यांच्या आई वडील, पत्नी मुले, भाऊ आणि कुटुंबियांनी हंबरडा फोडला. यामुळे उपस्थित असलेल्या अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत. सर्वजण या जवानाच्या अकाली जाण्याने हेलावून गेले होते. यावेळी चंद्रकांत जाधव अमर रहे…’, ’भारत माता की जय….’, ‘जबतक सूरज चांद रहेगा, चंद्रकांत तुम्हारा नाम रहेगा’ जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या वाहनातून वीर जवान चंद्रकांत जाधव यांची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी रेखाटण्यात आली होती. पार्थिवावर फुलांचा वर्षाव केला जात होता. विविध ठिकाणी फ्लेक्स लावून वीर जवान जाधव यांना ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली.