चौकशी समितीचा निष्कर्ष : डॉक्टर-अधिकारी, माजी मंत्र्यावरही ठपका
वृत्तसंस्था /चेन्नई
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल मंगळवारी सार्वजनिक करण्यात आला. अहवालात जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला, एक वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टरांवर ठपका ठेवण्यात आला आहे. जयललिता यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश ए. अरुमुघसामी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.
या समितीने 500 पानी अहवाल राज्य सरकारला सोपविला. जयललिता आणि शशिकला यांच्यादरम्यान संबंध बिघडले होते. समितीने नैसर्गिक मृत्यूऐवजी याला गुन्हा मानून चौकशी केली जावी अशी शिफारस केली आहे.
2016 मध्ये झाला होता मृत्यू
5 डिसेंबर 2016 रोजी चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात जयललिता यांचे निधन झाले होते. त्या सुमारे 2 महिन्यांपर्यंत रुग्णालयात दाखल होत्या. तसेच त्यावेळी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. वैद्यकीय पत्रकात हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याचे म्हटले गेले होते.
पन्नीरसेल्वम यांच्याकडून संशय व्यक्त
पन्नीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुकच्या अनेक नेत्यांनी जयललिता यांच्या मृत्यूच्या कारणावरून संशय व्यक्त केला होता. शशिकला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणी बरेच काही लपविले असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तत्कालीन पलानीसामी सरकारने चौकशी आयोग नेमला होता.
चिनम्मा अडचणीत
1991 मध्ये जयललिता यांच्या संपर्कात शशिकला आल्या होत्या. शशिकला त्यापूर्वी व्हिडिओग्राफीचे काम करायच्या. जयललिता आणि शशिकला यांची जोडी तमिळ राजकारणात लोकप्रिय झाल्याने जयललिता यांना अम्मा तर शशिकला यांना चिनम्मा असे संबोधिले जात होते.
इंग्रजी अन् तमिळ भाषेत अहवाल
निवृत्त न्यायाधीश अरुमुघसामी यांनी तमिळ आणि इंग्रजी भाषेत 500 पानांचा अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. जयललिता यांच्या मृत्यूसंबंधी 159 हून अधिक साक्षीदार आयोगासमोर हजर राहिले होते. आयोगाने नोव्हेंबर 2017 मध्ये जयललितांचे सहकारी आणि उपचार करणारे डॉक्टर, राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री विजयभास्कर, तत्कालीन आरोग्य सचिव राधाकृष्णन, तत्कालीन अर्थमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांची बाजू ऐकून घेत स्वतःची चौकशी सुरू केली होती. तर एम्सच्या डॉक्टरांच्या पथकाने जयललिता यांच्यावर करण्यात आलेल्या उपचारांमध्ये कुठलीच त्रुटी नव्हती असे स्पष्ट केल्याने चेन्नईतील अपोलो रुग्णालयाला दिलासा मिळाला आहे.
चौकशीच्या कक्षेतील 4 मुख्य व्यक्तिमत्त्वं
- व्ही.के. शशिकला : जयललिता यांच्या अत्यंत जवळच्या सहकारी होत्या. जयललिता यांच्याच निवासस्थानी त्यांचे वास्तव्य होते. जयललिता आजारी पडल्यापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत शशिकला सदैव सोबत होत्या.
- डॉ. के.एस. शिवकुमार : मुख्यमंत्री जयललिता यांचे फॅमिली डॉक्टर राहिलेले शिवकुमार यांच्यावरही याप्रकरणी आरोप ठेवण्यात आला आहे.
- राधाकृष्णन : तत्कालीन आरोग्य सचिव राधाकृष्णन यांच्यावरही आरोप ठेवण्यात आला आहे. जयललिता यांच्या प्रकृतीवर त्यांचीच देखरेख होती.
- सी. विजयभास्कर : तत्कालीन आरोग्यमंत्री विजयभास्कर हे जयललिता यांचे निकटवर्तीय होते. जयललिता यांच्या प्रकृतीबद्दल तेच जनतेला सातत्याने माहिती देत होते.