ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आपल्याकडे कोणी लाचेची मागणी केली तर आपण पोलिसांकडे जातो. पण पुण्यात एक डॉक्टर चक्क पोलिसांकडेच लाच मागत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका मृताचा अंतिम अहवाल देण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरने थेट पोलिसालाच 20 हजारांची लाच मागितली अन् पोलिसांनीही तडजोडीअंती त्याला 5 हजार रुपये दिले. यापूर्वीही या डॉक्टरने पोलिसांकडे लाच मागितल्याचे एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले. डॉ. एन. पी. झंझाड असे या डॉक्टरचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका 29 वषीय तरुणाचा मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृत्यू झाला होता. त्याचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात करण्यात आले. त्यावेळी ‘इंटर्नल हेड इंजरी’मुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याचे कारण डॉ. झंझाड यांनी दिले. झंझाड यांनी तरुणाच्या मृत्यूचे हे कारण दिल्यामुळे विलंब आणि खूनाचा गुन्हा दाखल करावा लागणार होता. त्यामुळे त्यांनी संबंधित तरुण दारुच्या आहारी गेल्याचे सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी या तरुणाचा अंतिम अहवाल देण्यासाठी पोलिसांकडे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, पाच हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली. यानंतर 5 हजार रुपये दिल्यानंतर तरुणाच्या मृत्यूचा अंतिम अहवाल देण्यात आला.
त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱयाने या प्रकरणाला वाचा फोडली. डॉ. झंझाड हे नेहमीच पैसे मागून अडवणूक करतात. अंतिम अहवाल (पोस्टमॉर्टम रिपोर्ट) देण्यासाठी ते प्रत्येक वेळी 100 रुपये घेतात. नाही दिले तर काहीतरी कारण सांगून माघारी पाठवतात. त्यामुळे पोलीस खात्याने एक पत्र काढत डॉ. झंझाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.