फलटण/प्रातिनिधी
motorcycle robbery : २४ तास गणपती विसर्जन बंदोबस्तानंतर क्षणाचीही विश्रांती न घेता, पडत्या मुसळधार पावसात धुमाळवाडी, ता. फलटण येथील ओढयातील पुराच्या पाण्यातून जीवाची पर्वा न करता आरोपींचा पाठलाग करुन आरोपींना शिताफीने पकडून आरोपीकडून मोटार सायकल चोरीचे ९ आणि एच.टी.पी. पंप चोरीचा १ असे एकुण १० गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये एकुण ७ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत एकुण ३ जणांना ताब्यात घेण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण, तानाजी बरडे यांचे मार्गदर्शन आणि पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली फलटण ग्रामीण पोलीसांची सातत्याने धडाकेबाज कामगिरी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत सुरु असतानाच मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांनी डोके वर काढले होते.
मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हापोलीस अधीक्षक, अजय कुमार बन्सल यांच्या सुचनेप्रमाणे व अप्पर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत होणा-या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होऊन ते उघड करण्याकरीता गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून विशेष पथक तयार करण्यात आले आहे. हे विशेष पथक वरील गुन्ह्यांच्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकल चोरी अनुषंगाने आरोपीचा शोध घेत असताना संशयीत आरोपी नामे श्रेयस उत्तम नाळे रा. दुधेबावी ता. फलटण, अमित विठ्ठल हुंबे रा. धुमाळवाडी, ता. फलटण, गणेश अरुण जगदाळे रा. मोगराळे ता. माण यांचा सहभाग असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, त्या माहिती वरुन वरील संशयीत श्रेयस उत्तम नाळे रा. दुधेबावी ता. फलटण, अमित विठ्ठल हुंबे रा. धुमाळवाडी ता. फलटण, गणेश अरुण जगदाळे रा. मोगराळे ता. माण यांना मुसळधार कोसळणाऱ्या पावसात धुमाळवाडी येथील ओढ्यातील पुराच्या पाण्यातून जीवाची पर्वा न करता संशयीत आरोपींचा पाठलाग करताना पोलीस नाईक काशीद हे किरकोळ जखमी झाले असताना देखील मनोधैर्य खचू न देता पाठलाग करुन संशयीत आरोपींना शिताफीने पकडले.
हे ही वाचा : पुसेगावात अवैध गुटखा वाहतूक करणारा पोलिसांच्या ताब्यात; पावणे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
त्यांच्याकडे वरील गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतू त्यास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून त्याचेकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला असता त्यांनी फलटण तालुक्यामध्ये तसेच मुंबई, पुणे शहर, खेडशिवापुर, शिरवळ, इंदापूर या ठिकाणाहून चोरलेल्या एकुण ९ मोटार सायकल व शेतीमध्ये औषध फवारणी साठी लागणारे एच. टी. पी. पंपाचे १ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यानुसार विविध गुन्ह्यांतील सुमारे ६ लाख ६५ हजार रुपये किंमतीच्या ९ मोटार सायकली व १ एच. टी. पी. पंप तसेच आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली ८० हजार रुपये किमतीची मोपेड मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.
सदरची मोटार सायकल संशयीत आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी वापरलेचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरु असून संशयीत आरोपींचेकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.