राज्यपाल रमेश बैस यांचे वाई सातारा येथील किसन वीर महाविद्यालयाच्या हेलिपॅड येथे आगमन झाले. यावेळी वाई- खंडाळा – महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील व जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.
पुस्तकांचे गाव भिलार हे देशासाठी आदर्श गाव
महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले असता राज्यपाल बैस यांनी भिलार या पुस्तकांच्या गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. पुस्तकांचे गाव भिलार पहायला मिळाले हे सौभाग्य असल्याची भावना व्यक्त करून राज्यपाल श्री. बैस म्हणाले, या गावातील लोकांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. देशातील नागरिकांसाठी ज्ञानाचे भांडार खुले केले आहे. आजकालच्या इंटरनेटच्या जगात लोकांचे पुस्तक वाचन कमी झाले आहे. पण या गावात लोकांनी पुस्तकांसाठी राहत्या घरातील जागा दिली आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. संपूर्ण गाव म्हणजेच ग्रंथालय असणे ही एक आगळीवेगळी ओळख असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या साताऱ्या दौऱ्यात राज्यपाल रमेश बैस यांनी वाई, सातारा येथील रेड क्रॉस सोसायटीचे बेल एअर सुपर स्पेशालिटी रुग्णालयास भेट दिली. राज्यपालांनी रुग्णालयातील विभागांची सविस्तर माहिती घेऊन शस्त्रक्रिया विभाग, अतिदक्षता विभाग, लॅबोरेट्री, सिटी स्कॅन, एक्सरे, जनरल वॉर्ड या विभागानं भेट दिली.