अजिंक्यतारा कारखाना स्थळावर आज एक्सो, रविवारी सकाळी मॅरेथॉन स्पर्धा, तयारी पूर्णत्वास
प्रतिनिधी/सातारा
सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी व संपूर्ण देशभरात लोकप्रिय अशी ही सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे दि. 18 रोजी होणार असून या स्पर्धेचे हे 11 वे वर्ष आहे. या संदर्भात शनिवार 17 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या दरम्यान भव्य एक्सपोचे आयोजन केले असून, शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील कै. अभयसिंहराजे भोसले सभागृह येथे हा एक्स्पो आयोजित केला आहे.
मॅरेथॉन स्पर्धेला स्वतःचा फोटो असलेले अधिकृत ओळखपत्र सोबत आणावे, असे आवाहन रेस डायरेक्टर डॉ. पल्लवी पिसाळ तसेच सातारा रनर्स फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुचित्रा काटे, उपाध्यक्षा डॉ. रंजिता गोळे व सचिव डॉ. अदिती घोरपडे यांनी केले आहे.
मॅरेथॉनसाठी अनेकांचे सहकार्य
संपूर्ण देशभरात नावाजलेल्या या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा जिल्हा पोलीस प्रशासन, वाहतूक नियंत्रण कक्ष, सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा नगरपालिका, एस.टी महामंडळ व वन विभाग यांनी प्रशासकीय सेवांची बांधणी केली आहे. तसेच ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रोटरॅक्ट क्लब, महाराजा ग्रुप, जेष्ठ नागरिक संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प, ढाणे मेगा इंजिनीरिंग क्लास, प्रतिभा हॉस्पिटल, सुविधा पेंटस्, मीनाक्षी हॉस्पिटल, सावकार इंजिनीरिंग कॉलेज, सूर्यप्रभा हॉस्पिटल, यशोदा टेक्निकल इन्स्टिटयूट, कन्याशाळा, कनिष्क नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, आय.डी बी.आय. बँक, महात्मा गांधी क्रीडा मंडळ, हिंदवी पब्लिक स्कूल, श्रीनिधी पतसंस्था, मारवाडी चौक मित्र मंडळ, अनंत इंग्लिश स्कुल माजी विद्यार्थी संघटना, 13 भवानी ग्रुप, सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा इंग्लिश मेडीयम स्कूल व विविध सामाजिक संस्था, संघटनानी देखील कंबर कसली आहे.
हे ही वाचा : पोलीस भरतीसाठी फडणवीसांसमोर विद्यार्थ्यांची घोषणाबाजी, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
याबरोबरच यवतेश्वर व सांबरवाडी ग्रामस्थांनीदेखील जोरात तयारी सुरु केली असून ग्रामस्थांनी येणाऱया पाहुण्यांची उत्तम व्यवस्था होण्यासाठी व स्पर्धेच्या नियोजनात मदत करण्यासाठी अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे. स्पर्धकांसाठी साताऱयातील सर्व हॉटेल्स आणि लॉजचे बुकिंग फुल्ल झाले असून काही स्पर्धकांना निवासाची व्यवस्था उपलब्ध न झाल्यास सातारकरांनी पाहुण्या स्पर्धकांची निवासाची व्यवस्था आपल्या घरात करावी असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
तरी सर्व स्पर्धकांनी आपापले बिब व रेस किट शनिवार 17 रोजी शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना येथील कै. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथून घेऊन जाणे आवश्यक आहे. तसेच या स्पर्धेच्यादिवशी सर्व स्पर्धकांनी पोलीस परेड ग्राउंड मैदान येथे सकाळी 5.30 वाजेपर्यंत हजर राहणे आवश्यक आहे.
सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे हे 11 वे पर्व यशस्वी होण्यासाठी सर्व सातारकरांनी या उपक्रमाच्या निमित्ताने साताऱयात दाखल होणाऱया आपल्या पाहुण्यांना प्रोत्साहन द्यावे तसेच त्यांना मदत करावी व ऐतिहासिक सातारानगरीचा लौकिक वाढवण्यामध्ये सातारा रनर्स फौंडेशनच्या सर्व संचालकांच्या प्रयत्नांना हातभार लावावा असे या आवाहन सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे व रेस डायरेक्टर डॉ. पल्लवी पिसाळ तसेच सातारा रनर्स फौंडेशनचे अध्यक्षा डॉ. सुचित्रा काटे, उपाध्यक्षा डॉ. रंजिता गोळे व सचिव डॉ. अदिती घोरपडे यांनी केले आहे.