प्रतिनिधी/कराड
कराड तालुक्यात कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या संजय मोहिते यांचे बुधवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने कराड तालुक्यासह जिल्हा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती.
कराड तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेचा वचक वाढवण्यात संजय मोहिते यांचा मोठा वाटा होता. स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मोहिते यांचे त्या काळी थेट संपर्क होता. मलकापूर येथील आगाशिवनगरच्या निवास्थानी त्यांचे वास्तव्य होते. बुधवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कृष्णा रूग्णालयात दाखल केले. मात्र ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेचा शिवसैनिकांसह सर्वपक्षीय मित्रपरिवाराला धक्का बसला. मोहिते यांचे सर्वच पक्षात मोठे मैत्रिचे संबंध होते. त्यांंनी राजकारणविरहीत मोठा मित्रपरिवार जोडला होता.