कराड / प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी कराड शहरासह परिसर सज्ज झाला असून या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी १६५ संशयीतांच्या तात्पुरत्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत. या प्रस्तावातील संशयितांवर स्थानबद्ध किंवा तात्पुरती हद्दपारीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले, गणेश आगमन, उत्सवाचा दहा दिवसांचा कालावधी आणि विसर्जन अशा तीन वर्गात पोलिसांनी आराखडा तयार केला आहे. हा आराखडा राबवताना कायदा व सुव्यस्थेला बाधा पोहचवतील अशा १६५ जणांना तात्पुरते हद्दपार करावे किंवा स्थानबध्द करून त्यांच्या हालचालींवर कायम लक्ष ठेवण्याचे प्रस्ताव आहेत.
जामिनावर असलेल्या किंवा एखाद्या गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेल्या १३ जणांवर कडक कारवाईचे प्रस्ताव पाठवले आहेत. तर रेकॉर्डवकील ५० अन्य संशयीतांवरही वेगवेगळ्या कलमाव्दारे कारवाईचा प्रस्ताव आहे. शहरातील पोलिस भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या सर्व संस्थांशी संपर्क साधून त्याची मदत घेण्यात येणार आहे. घरगुती विसर्जनानंतर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र तर विसर्जन मार्गावरही कडक बंदोबस्त असणार आहे. त्यासाठी आम्ही आराखडा केला आहे. पोलिस १०० स्वयंसेवकांची मदत घेतली आहे. त्यासाठी त्यांना स्वतंत्र पोशाख देण्यात आला आहे. त्यांच्याकडे प्रशासन व मंडळ समन्वयकाची भुमिका त्यांची असमार आहे. त्याशिवाय जलद कृती दलासहीत शिघ्र कृती दलाचे पोलिसही तैनात होणार आहेत. त्यासाठीही स्वतंत्र मागणी करण्यात आली आहे. विसर्जन मार्ग त्यादिवशी पूर्ण मोकळा ठेवला जाणार आहे.