प्रतिनिधी/खंडाळा
खंडाळा तालुक्यातील पारगांव येथे विहिरीत बुडून एका युवकाचा दुर्देवी मृत्यू झाला. मंदार उर्फ संकेत मधुकर गायकवाड (वय २७) असं विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत खंडाळा पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मंदार गायकवाड हा बुधवारी दुपारी गणपतीची सजावट करून शेतात गेला होता. शेतातील विहिरीत तो पाय घसरून पडला. त्याला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. तो संध्याकाळी घरी परत न आल्याने सर्वांनी त्याचा शोध घेणे सुरु केले. त्याची दुचाकी त्याच्या शेताजवळ आढळल्यावर तरुणांनी परीसरातील विहिर तपासण्यास सुरुवात केली. मात्र संध्याकाळी पाऊस सुरु झाला व अंधारामुळे शोधकार्य थांबवले. गुरुवारी सकाळी विहिरीत शोध घेतला असता सकाळी ९ च्या सुमारास त्याचा मृतदेह विहिरीच्या तळाशी आढळला. गळाच्या साह्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलीसांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला. खंडाळा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद आकस्मित मयत म्हणून करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शानाखाली अधिक तपास हवालदार प्रशांत धुमाळ करीत आहेत.