बोलण्यात गुंतवून कोयत्याने वार करुन निघृण खून करणाऱयांपैकी एकास 3 जानेवारीपर्यंतअभिरक्षा कोठडी : वाई पोलिसांचे डिटेक्शन : पडकलेल्या तिसऱ्या संशयितासमवेत वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे व पथक.
सातारा / प्रतिनिधी
सिद्धनाथवाडीतल्या 17 वर्षीय न्यास शिवाजी खरात याचा शेतात निघृण खून केल्याची घटना दि.29 डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. त्या प्रकरणात दोन अल्पवयीन युवकांना ताब्यात घेलते तर त्याप्रकरणी आणखी एकास अटक केली. तिसऱ्या संशयितास दि. 3 जानेवारीपर्यंत पर्यंत अभिरक्षा कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.दरम्यान, दोन वर्षापूर्वी वाई स्टँडसमोर न्यासने मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरुन त्यास ती भांडणे मिटवायची म्हणून बोलवून घेतले. त्यास बोलण्यात गुंतवून त्याच्या डोक्यात पाठीमागून कोयत्याने वार करुन त्याचा खून केल्याचे तिघांनी सांगितले.
वाईनगरीत अलिकडच्या काळात बालगुन्हेगारांचे प्रमाण वाढू लागले आहे. अर्जून यादवच्या खूनात सुद्धा अल्पवयीन युवकांचा समावेश होता. त्या प्रकरणानंतर पुन्हा वाई शहरालगतच्या शेतात खून झाल्याची घटना उघडकीस आल्याने दि. 29 रोजी खळबळ उडाली होती. त्या प्रकरणी वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी आपल्या पोलिसी नजरेने संशयितांची माहिती मिळवण्यात यश आले. न्यासचा खूनाची उकल करणे तसे वाई पोलिसांच्या समोर एक आव्हानच होते. मात्र, खुनी किती जरी शातीर असला तरीही काहीतरी सुराग ठेवत असतो. त्याच सुरागाच्या आधारे वाई पोलीस संशयितापर्यंत पोहचले.
तिघा संशयितांचा ठावठिकाणा मिळाला. ते कराड, पुणे येथे गेल्याचे पोलिसांना समजले. तेथे जाण्याच्या तयारीत पोलीस पथके तयार होती. तोच पुन्हा बातमी समजली की एक जण लोहारेच्या स्मशानभूमीत लपून बसलेला आहे, दुसरा संशयित वेळे येथे मित्राकडे आहे. त्या दोघांना पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी दोन पथके वेषांतर करुन पाठवली. लोहारे येथे स्वतः पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, हवालदार विजय शिर्के, किरण निंबाळकर हे अंत्यसंस्कारासाठी लाकडे घेवून स्मशानभूमीत गेले. तेथे मित्राची वाट पहात असलेला नंबर एकचा संशयित आढळून आला तर वेळे येथे पाठवलेल्या पथकामध्ये श्रावण राठोड, अमित गोळे आणि प्रसाद दुदुस्कर यांनी साध्या वेशात दुचाकीवरुन पत्ता बहाण्याने दुसऱया संशयितास ताब्यात घेतले. त्या दोन अल्पवयीन युवकांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली असता पहिल्या संशयिताने दोन वर्षापूर्वी न्याससोबत वाई स्टॅडसमोर भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरुन दि. 28 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता भांडणे मिटवायची आहेत म्हणून त्यास बोलवून घेतले आणि सिद्धनाथवाडी येथील शेतात घेवून गेले. तेथे त्याचे बोलण्यात लक्ष गुंतवून ठेवत त्याने त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्याच कोयत्याने त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या संशयिताने वार करुन न्यासचा खून केला. त्या दोघांना सहकार्य करणारा तिसऱ्या संशयितालाही पोलिसांनी पकडले. त्यामध्ये दोन अल्पवयीन युवकांना ताब्यात घेतले तर तिसऱ्या संशयिताला अटक करुन त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दि. 3 पर्यंत अभिरक्षा पोलीस कोठडी सुनावली आहे. याचा तपास वाई पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे या करत आहेत.