जिल्हा रुग्णालय वाऱयावर, रुग्णाला ओढून मारहाण तरी गुन्हा दाखल नाही
प्रतिनिधी/ सातारा
रविवारी सातारा जिल्हा रुग्णालयात घुसून रुग्णाला मारहाण झाली, दोन गटात तुफान ऐन दवाखान्यात धुडगूस झाला. मात्र चोवीस तास उलटून गेले तरी याची पोलिसांत नोंद नाही, त्यामुळे सातारा पोलीस झोपलेत की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
रविवारी रात्री जिल्हा रुग्णालयात तुफानी धुडगूस झाला. अगदी काही रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सैरावैरा धावले. रामनगर (ता. सातारा) येथील दोन गटात झालेल्या घरगुती वादाचे हे पर्यावसान होते. रात्री 8.30 वाजता जे घडले ते सारे सीसीटीव्हीमध्ये कैद आहे मात्र चोवीस तास उलटून गेले तरी हा गुन्हा नोंद झालेला नाही.
प्रकार इतका भडक स्वरुपाचा होता की ट्राफिकचे काही लोक घटनास्थळी दाखल झाले होते, त्यांनी हा प्रकार डोळ्यांनी पाहिला. हे सगळे घडून पण पोलिसांत याची सोमवारी रात्रीपर्यंत नोंद नव्हती.
गोसावी म्हणे, मला काय माहित?
जिल्हा रुग्णालयात अनेक वर्षे कार्यरत असलेल्या पोलीस गोसावी यांना विचारले असता त्यांनी ‘आपल्याला काय माहित, आपण तर डय़ुटीवर नव्हतो’ असा पवित्रा घेतला.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत डय़ुटीवर असलेल्या ‘गुरव’ नामक जवानाने याची नोंद घेऊन गुन्हा का नोंद केलेला नाही? याबाबत चर्चा आहे.
डोळे झाकलेला तो पोलीस कोण?
जिल्हा रुग्णालयात सरेआम गुंडागर्दी झाली, दोन्ही गटांकडून जबरदस्त हाणामारी झाली, तरी सातारा पोलीस केवळ कोण तरी येईल, गुन्हा दाखल करेल? या अपेक्षेत राहिली. मात्र इतका धिंगाणा झाला तर मग जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीचा रखवालदार कोण होता? त्याने का डोळे बंद केले? त्याने का नाही गुन्हा नोंद केला? हे प्रश्न अनुत्तरित आहेत !