पोलीस घटनास्थळी दाखल, पुरातत्व विभागाकडे दिल्या जाणार गोळ्य़ा
सातारा प्रतिनिधी
पालिकेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाकरता खोदकाम करत असताना एक हजारहून अधिक रायफलीच्या जुन्या गोळय़ा आढळून आल्या आहेत. ही बाब सातारा शहर पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली असून या सापडलेल्या रायफलीच्या गोळ्य़ा पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सातारा पालिकेच्या नूतन इमारतीचे काम कल्याणी परिसरात सुरु आहे. त्याकरता पायासाठी खोदकाम जेसीबीच्या सहाय्याने सुरु असून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने खोदत असताना जेसीबीच्या दाताला एक लोखंडी बॅरलवजा वस्तू लागली असून त्यामध्ये सुमारे एक हजारहून अधिक रायफलीच्या गोळय़ा व इतर गंजलेले साहित्य आढळून आले. या घटनेची माहिती काम करणाऱ्या कामगारांनी सातारा शहर पोलिसांना दिली. तसेच सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनाही याची माहिती दिली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या सुचनेनुसार लगेच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे हे घटनास्थळी कर्मचारी घेवून पोहचले. त्यांनी त्या गोळ्य़ा ताब्यात घेतल्या असुन अजून काही हाती येते काय याची तपासणी करत आहेत. दरम्यान, या गोळ्य़ा कोणत्या कालावधीतील असू शकतील याच्या तपासासाठी पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांनी सांगितले.
सर्व गोळ्य़ा गंजलेल्या
आढळून आलेल्या सर्व गोळय़ा या गंजलेल्या अवस्थेतील असून त्याच बरोबर जे साहित्य आढळून आले तेही सर्व गंजलेल्या स्थितीत आहे. फक्त या गोळय़ा वजनाला जड असून पुरातत्व विभागाचे अधीक्षक प्रवीण शिंदे यांना अजूनही काही माहिती नसल्याचे समजते.